Monday, 23 November 2020

कल्पवृक्ष कन्येसाठी...

 कल्पवृक्ष कन्येसाठी#

आज माझ्या बाबांचा चोविसावा स्मरणदिन. स्मरणाची पंचवीस वर्षे असंही काही असू शकतं असा काही विचार नाही यामागे. मात्र अनेक वर्ष बाबांबद्दल सविस्तर लिहायची संधी आज घेते आहे.

शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, वक्तृत्व, संगीत,संघटना,लेखन, लोकसंग्रह आणि बरंच काही....

तत्कालीन शिक्षणमंत्री कै.आ. अनंतराव नामजोशी यांचे स्वीय सचिव, युवाकाळात गिरगावची शाखा घेणारा कुशल दादा, वासुदेव बिल्डिंगच्या नाटकांसाठी नाटके लिहिणारा, कविता रचणारा, उत्तम अभिनय करणारा माझा बाबा....

बाबांच्या गिरगावातल्या शाळेत त्यावेळी बाबांचा फोटो लावला होता... शाळेला हमखास पारितोषिके मिळवून देणारा विद्यार्थी... जिथे कमी तिथे मी ही उक्ती सार्थ लागू पडणारी...आपले शारीरिक व्यंग कुठेही आड येऊ न देता हा प्रवास सुरूच राहिला. अपंगांसाठीचे काम असेल, त्यांची आयुष्य सावरणं असेल, पुण्यात प्रवचनाला येणार्‍या वयस्करांना धार्मिक सहलीला नेणं असेल किंवा माझ्या मैत्रिणींशी इतकंच नाही तर मित्रांशीदेखील मोकळेपणाने वागणं असेल....

बाबांची प्रवचनं, बाबांच्या स्वरचित आणि स्वतःचालीत लावलेल्या कविता... शृंगारापासून ते भक्तीपर्यंत आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत सबकुछ " दिलीप"!

माझ्या काकाला नेहमी वाटतं की दिलीपला आणखी आयुष्य लाभायला हवं होतं! मी जेव्हा प्रज्ञावंतता हा शब्द ऐकते त्याक्षणी माझ्यासमोर बाबाच येतात... एका व्यक्तीत दडलेले किती गुण असावेत.....

मुलगी आणि बाप यांचं एक विलक्षण नातं असतं! मी बाबांना अशा खूप टप्प्यांवर पाहिलं... त्यांच्या प्रवचनानंतर गुरुपौर्णिमेला त्यांच्या पायावर डोकं ठेवणारा साधकवर्ग त्यांना रूचत नसे. ते प्रति नमस्कार करीत.... ही शिकवण वारकरी संप्रदायाची... बाबांबरोबर जुने ग्रंथ शोधत मी आळंदी देहूच्या गल्ल्या पालथ्या घातल्या आहेत! आपल्या वडिलांना मिळणारा मान म्हणजे नेमकं काय हे कळण्याचं ते वय नव्हतं, पण ते आज समजतं आहे!लिहावं तर बाबांनीच! अक्षर म्हणजे मोत्याचा दाणाच जणू!

वारीची दिंडी पुण्यात येणं असो वा एखाद्या अपंग कुटुंबाला मदत असो, राजकीय वर्तुळातलं वावरणं असो वा कधीतरी स्वयंपाकघरात एखादा वेगळा पदार्थ करणं असो... 

ही यादी न संपणारी आहे... आज जे लोक मला आर्या जोशी म्हणून ओळखतात त्यांच्यासमोर मी मारे शूर असते पण बाबांची व्याख्यानं ऐकलेली जुनी खोडं जेव्हा दिलीपकाकांची लेक व्याख्यान देणार आहे म्हणून मला ऐकतात तेव्हाचं दडपण हे वेगळंच असतं!

त्यांचा वारसा नकळत मला मिळाला... तो टिकवण्याची क्षमता माझ्यात खचितच नाही. पण जमेल तसं करीत राहणं, स्वतःला घडवणं हाही त्यांचाच वसा!


तुमच्या खांद्यावरून जग पाहिलं

त्या जगाचा मी अंश होते

पण  एका हळव्या क्षणासाठी

तुमची लेक म्हणूनच " जगते"

अदिती!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...