व्रते आणि दाने# माझा विचार माझी कृती
एक अभ्यासक म्हणून आपण समृद्ध होत जातो तसं तो विचार आपल्या दैनंदिन जीवनातही उतरायला लागतो. काही वेळा त्याला विरोध होतोही पण जर आपल्या कृतीमागच्या विचाराची स्पष्टता आपल्याला असेल तर आपण निश्चयाने आपल्या गोष्टी करू शकतो.
माझ्या लग्नानंतरची पाच वर्ष मी शिवामूठ वाहिली. पण घरच्या देवाला शास्र म्हणून दोन दाणे धान्य वाहून उरलेले धान्य मी कुणातरी गरजूला द्यायचे ठरविले.
त्यावेळी ज्ञानप्रबोधिनीची नवीन वास्तू जिथे आज उभी आहे तिथे परांडे वाडा होता आणि प्रबोधिनीचा वाहनतळही तिथे होता. वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक दादा तिथे असत.मी धीर करून त्यांना विचारलं की मी शिवामूठ वाहण्याऐवजी प्रत्येक श्रावणी सोमवारी जे धान्य असेल ते तुम्हाला दिलं तर घ्याल का?ते मला ओळखत असल्याने हो म्हणाले आणि नंतर पाचही वर्ष मी देवापुढे घरी ते धान्य ठेऊन त्यातले अक्षरशःदोन दाणे पिंडीवर वाहत असे आणि वाहनतळावर गाडी लावली की एक किलो धान्य दादांना देऊन त्यांना नमस्कार करत असे. वाया जाण्यापेक्षा मुखी पडलेले कधीही उत्तम!
आजही आधुनिक पिढीतल्या मुली संपर्क करतात. याबद्दल विचारणा करतात तेव्हा मी त्यांना हेच सांगते की चातुर्मासातील कहाण्यांकडे सामाजिक दृष्टीकोनातून पहा. गृहस्थाश्रम हा समाजाचा आधार आहे हे या कथांमधून वारंवार दिसून येते. त्यामुळे समाजातील गरजू ओळखा आणि त्यांना सहाय्य करा.
असे वेगवेगळे उपक्रम समाजात सुरू आहेत. दानं संविभागः । याचाच अर्थ मी जे कष्टाने कमवते आहेत्यातील काही भाग हा मीज्या समाजाचा घटक आहे त्या समाजाचाही आहे. यातून समाजाचे आपल्यावरील ऋण फेडण्याची संधी अवश्य घ्यावी.
यावर्षी तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना अन्नधान्याची, सुविधांची गरज आहेच. ती पूर्ण करण्याची संधी या श्रावणात अवश्य घेऊया.
आपण अशा नव्या कालसंगत कथा लिहूया, समाजाला उपयोगी पडतील अशी कामे करूया... खुलभर दुधाची कहाणी ही हेच सांगते हे वारंवार मनात ठसवूया आणि श्रावणाचे इंद्रधनुष्य सामाजिक जाणिवा विस्तारत आपल्याच मनाच्या क्षितीजावर उमटवूया!!!
No comments:
Post a Comment