Wednesday, 6 January 2021

खिचडी

 भोगी#मकरसंक्रांती#खिचडी#भारताच्या विविध प्रांतात#रूचिवैचित्र्य#कृषी संस्कृती#सण#आनंद


खिचडी...

साबुदाण्याची नसून मुगाच्या डाळीची.... हा माझा जरी गृहिणी म्हणून खास आवडता पदार्थ असला आणि दोन तीन वेगळ्या प्रकारे तो मला चांगल्या प्रकारे करता येत असला तरीही आज हा लेख माझ्यातील गृहिणीने लिहीलेला नसून मुक्त ज्ञानकोश समृद्ध करण्याचा छोटा प्रयत्न करणार्‍या संपादिकेने लिहीला आहे हे नमनाला घडाभर तेल घालावेसेच वाटते.(खिचडी फोडणीला घालताना तुमचे तेल तुमच्या सोयीने आणि आवडीनुसार तुम्ही घालू शकता.)

तर मुद्दा असा की त्या त्या प्रत्येक सणाच्या वेळी विकीवर लेख नव्याने लिहिणे किंवा आधीच्या लेखात भर घालणे अशी माझी सवयच झाली आहे आता. मकरसंक्रांतीवर बोलण्याच्या निमित्ताने नवं काही वाचलं जातं, वाचलेलंच विकीवर लिहिलही जातं... तर आता यावेळेचा विषय ... खिचडी...

भारताच्या विविध राज्यात साजरी होणारी मकरसंक्रांती याविषयी वाचन,लेखन करताना तोंडाला पाणी सुटलं नसेल तर नवल! 

गुजरातेत गेले तर उंधियुचा उल्लेख अपरिहार्यच होता.... बंगालमधे भटकले तेव्हा तीळ पीठ्याचा वास नाकात शिरलाच.... तमिळनाडूतली शेतकर्‍याच्या अंगणात उतू जाणारी उसाचा रस आणि गूळ घातलेली मूगडाळ आणि तांदळाची खीर पाहूनच मी तृप्त झाले.... किती काय अन् किती काय....

हिमालयाच्या सुदूर पर्वतरांगांमधे जा किंवा बिहारमधे,महाराष्ट्रात  किंवा बिहारमधे... भोगी आणि मकरसंक्रांतीला देवाला नैवेद्यासाठी खिचडी हवीच बरं का!

भारताच्या राज्याराज्यात आपण या खिचडीतले वैविध्य पाहू शकतो.... बिहारमधे विविध भाज्या घातलेली खिचडी तर हिमाचल प्रदेशात भरपूर तुपाने ओथंबलेली खिचडी,राजस्थानात त्यात तिळकूट घालतात तर आंध्र प्रदेश,कर्नाटक या भागात रसरशीत लाल भोपळा या खिचडीत घातला जातो.

आत्ताच्या ऋतूत माझ्या शेतात आलेल्या भाज्या, ताज्या उसाच्या रसापासून तयार केलेला ताजा गूळ, भरपूर सारे तीळ, आणि डाळ ,तांदूळ,मैदा , केळी , दही ,दूध अशी वेगवेगळी मिश्रणं वापरून केलेली मिष्टान्न या सणाचा आनंद वाढवितात. तीळ आणि गुळाचे पदार्थ म्हणजे तीळगूळ, कुठे तो लाडूच्या रूपात येतो तर कुठे त्यात सुकं किसलेलं खोबरं घालून नुसतीच भुकटी हातावर येते.

खिचडीबरोबर पापड, लोणचं, दही, तूप यांचीही रेलचेल हवीच आणि नैवेद्याच्या पानात तिळकुट, तीळगुळही हवाच!

पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि पत्राणि... म्हणतात नं तसंच ही अन्नपूर्णेचीही पूजाच आणि अन्नब्रह्माची सिद्धता!!!

उत्तरायणाचा मनमुराद आनंद घेताना शरीराला उब देणारे आणि पौष्टीक असे हे पदार्थ नुसते वाचूनच खावेसे वाटले की नाही?

गोधनाची पूजा, त्यांच्याविषयी कृतज्ञता या सणाच्या निमित्तानेही होते. आप्तस्वकीयांसह संक्रांत भोजनाचा आनंदही घेतला जातो. थोडक्यात काय भारतीय मन उत्सवी आहेच... आणि भोजनाचा आनंद वाढविण्याची रसिकताही आपल्या ऋतूचक्राने आपल्याला बहाल केली आहे... 

चला तर... भोगीची खिचडी... आणि संक्रांतीचा तिळगूळ... मी तर लेख लिहीता लिहिता मनानेच खाल्ला... आता तुम्ही ठरवा यावर्षी कोणत्या प्रांताची खासियत असलेली खिचडी करुन पाहणार???

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...