सोमवारपासून करावली विकीसमूहासह सुरू झालेला हा प्रवास आज थांबतो आहे.आजचा दिवस विश्रांतीचा आणि कोटराकडे परतण्याचा.
आपण काहीतरी चांगलं काम करण्यासाठी बाहेर पडतो आहोत ज्याचा समाजाला थेट उपयोग होणार आहे हे मी हल्ली मनात ठसवूनच घराचा उंबरठा ओलांडते.अन्यथा एक आई,एक बायको,एक सून घराबाहेर पडणं हे तितकं सोपं आजच्या गतिमान युगातही नाही.पण काम संपलं की घराची ओढ लागतेच!
मागच्या वर्षी ईशान्येत मला नवी माणसं भेटली.तिथे इंग्रजी आणि हिंदी भाषा अवगत असलेली बरीच मंडळी होती त्यामुळे फार अडचण नाही आली.पण इथे मात्र मज्जा होती.ना कन्नड समजत ना तुळू! पण तरीही इथे प्रेम "भेटलं".
ज्या महिलांना मी ओळखत नाही किंवा ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही त्यांनी माझे हात हातात घेऊन माझं स्वागत केलं.पुरुष मंडळींनी आदरपूर्वक दोन हात जोडून नमस्ते म्हटलं.ही मंडळी तुळूमधे किंवा कानडीत बोलायला सुरुवात करायची आणि मला बोलावंसं वाटूनही प्रतिसाद देता यायचा नाही.मग करावली विकी समूहातील माझी मैत्रिण यक्षिता प्रत्येकवेळी माझ्या मदतीला यायची.पण तरीही "हास्य" हा इतका बहुमोल दागिना आपल्याला परमेश्वराने बहाल केला आहे की त्यातून भाषेच्या पलीकडे जाऊन माणसं आपल्याला जोडता येतात.
भरतेशला मी भेटले प्रथमच.सर्व संवाद मेल,दूरभाष आणि गुगल मीटवर.पण त्यांच्या उत्सवात सहभागी होऊन एकत्र अभ्यास करण्याची माझी इच्छा त्याने अतिशय प्रेमाने उचलून धरली.इथे आल्यापासून मी जे पहायलं हवं,अभ्यासायला हवंच असं त्याला वाटत होतं ते सारं मला दाखवण्याची त्याची धडपड कौतुकास्पद आहे. माझ्यासारख्या म्हटलं तर विकी परिवारातील पण तरीही भौगोलिकदृष्ट्या बाहेरच्या व्यक्तीला सामावून घेणं यांना किती सहज जमलं!
माझ्या बुद्धीत मी जे साठवलय तो माझ्या कामाचा,अभ्यासाचा भाग होता पण माझ्या मनात,हृदयात जे घेऊन मी परतते आहे त्याला खरोखरीच तोड नाही.
प्राध्यापक,संशोधक,कॅमेरामन,दिग्दर्शक यांच्यापासून ते ग्रामीण भागातील सुपारीची बाग सांभाळणारा,भातशेती करणारा शेतकरी अशी ही सगळी मंडळी.अभिनिवेश कुणालाच नव्हता.
कन्नड विषयाचे प्राध्यापक विश्वनाथ बडिकना यांच्या चारचाकीतून मी सगळीकडे गेले. या गृहस्थाकडे प्रचंड विद्वत्ता आहे पण ती माणुसकीच्या हातात हात घालून येते.प्रा.तुकाराम निडल हेही असेच आहेत.
महाराष्ट्र आणि तुळूनाडू येथील लोकसंस्कृतीबद्दल,अगदी स्वयंपाकघरात रोज शिजणार्या पदार्थांबद्दल आम्ही मोकळेपणाने बोललो.आपापल्या लेकराबाळांचे फोटो,व्हिडिओही कौतुकाने एकमेकांना दाखवले.
करावली विकी समूहाचे सारेच सदस्य.. पाच किंवा सहाच आहेत ते.विकी समूहाच्या विस्तीर्ण क्षितीजावर नगण्य वाटू शकतील असे.पण तरीही प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा त्यांच्यात आहे.
यक्षिताच्या घरी मी राहिले.नीर डोसा पासून इडीअप्पम पर्यंत स्वतः सर्व करून मला प्रेमाने खायला घालून तिने तिचं प्रेम दाखवलं आहे!
यक्षिताच्या निरक्षर ग्रामीण जीवन जगलेल्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीने मला बाहेर निघताना तयार होताना पाहिलं.घरात साध्या पोशाखात असलेली मी आणि बाहेर जाताना मी हातात घातलेल्या बांगड्या,कानात घातलेले लोंबते डूल हे सर्व आजी निरखत होत्या.त्या तुळूमधे काहीतरी बोलल्या आणि त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला.यक्षिता म्हणाली आजी म्हणते आहे " You looks preety".
म्हणजे माझ्या बग्गीच्या भाषेत "छुंदड".
का नाही दिसणार मी सुंदर? कारण ज्या ज्या वळणांवर प्रेम भेटतं आणि ते आपल्यासोबत राहतं तिथे सौंदर्यही खुलतं!
हा माझा आनंद माझ्या चेहर्यावर प्रतिबिंबित व्हावा आणि तो मी नक्की काय करण्यासाठी इथे आले आहे हे जिला माहिती नाही अशा आजीच्या मुखातून बाहेर पडावा यातच सारं काही आलं! नाहीतर माझ्यासारखी व्यक्ती जी लौकिकार्थाने सौंदर्याच्या कुठल्याच कक्षेत मावत नाही तिने मनापासून आनंद घ्यावा आणि तो इतरांनाही द्यावा यातच या अभ्यासभेटीची कृतार्थता आहे.
परिपूर्ण कुणीच नाही... प्रत्येकातच कमी अधिक आहे.. पण तरीही भाबड्या कष्टकरी समाजाच्या निष्ठावान आणि श्रद्धावान आनंदी आयुष्याचा जवळून अनुभव घेतला की मनोमन पटतं "हे जीवन छुंदड आहे!"
No comments:
Post a Comment