(या लेखात सधवा,विधवा असा शब्दच्छल किंवा अनादर अपेक्षित नाही याची कृपया नोंद घ्यावी. केवळ अविधवा नवमीच्या निमित्ताने सुचलेले हे काही नोंदवीत आहे.)
ती एक ज्योती # अविधवा नवमी -एक विचार
माझ्या आयुष्यातल्या दोन महत्वाच्या स्रिया अहेवपणी गेल्या.एक माझी आई आणि दुसर्या माझ्या सासूबाई.दोघींचंही माझ्या आयुष्यात विशिष्ट स्थान आहे.
या दोघींचा विचार करता अविधवा नवमीच्या स्मरणाचं औचित्य मला अधिक जाणवतं.
कुटुंबाला आणि त्यायोगे समाजालाही तुमची गरज असताना,सारा कुटुंबकबिला मागे ठेवून एका क्षणी कुटुंबातली कर्ती स्री अचानक नजरेआड होते कायमस्वरूपी.तिच्या नसण्याचं स्मरण पावलोपावली होत असताना मग पितृपक्षात वेगळं स्मरण का योजलं असावं?
ती असते तेव्हा तिच्या पद्धतीने कुटुंब आकार घेतं,तिच्या विचारानुसार कुटुंबाच्या कक्षा ठरतात,घराचे नीतिनियम ठरतात.तिच्या घडणीनुसार ती आपापल्या परीने परंपरा सांभाळते,नाती जपते.रूसवेफुगवे तिलाही असतातच पण तरीही कुटुंब बांधून ठेवण्याची हातोटी तिला असते.ज्या क्षणी ती जाते त्या क्षणी एक पोकळी तयार होते न भरून येणारी... त्यामुळे तिचं स्मरण.
मला आईची साडी,तिच्या पदराची ऊब आठवते तसं सासूबाईंच्या हातातल्या बांगड्यांची किणकिणही आठवते. आईच्या हातचे पदार्थ आणि अहो आईंच्या हातचे पदार्थ,त्यांच्या साड्या,त्यांचे दागिने असं सारं माझ्यापाशी असलं तरी त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची उणीव जाणवतेच.
मग हे एखाद्या विधवेला लागू नसेल का? तर जरूर आहे.फक्त तिचा पती तिच्याआधी गेला इतकाच फरक.
तो त्या काळात अधिक जाणवला असेल ज्याकाळात परकीय आक्रमणांमुळे युद्धात पती मारला गेला.लहान वयातच मुलीचं लग्न झालं आणि शिक्षणही बंद झालं.पती हाच आचार्य आणि विवाह हाच उपनयनसंज्ञक विधी ठरला! तिच्यापेक्षा वयाने मोठा पती कधी आजाराने दगावला!कधी युद्धात वीरगतीला गेला तर कधी आणखी काही! समाजाने तिला ताठ मानेनं जगण्याची संधी दिली नाही.तिचा मूक शारीरिक,मानसिक,बौद्धिक संघर्ष ती जगत राहिली,सहन करीत राहिली.अशक्य झालं तेव्हा तिने प्रसंगी स्वतःला संपवलं देखील!
काहीवेळा पतीच्या चितेवर तिला सक्तीचं आरोहण करावं लागलं आणि तिचा आक्रोशही वाद्यांच्या आवाजात दाबला गेला.
लहानपणी पिता,विवाहानंतर पती आणि त्याच्यानंतर पुत्र तिचा सांभाळ करेल असंही स्मृतिकारांना म्हणावं लागलं!
मग तिचं अस्तित्व आदरपूर्वक तेव्हाच सांभाळलं जाणार जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे! तो हयात असताना हिरव्या काकणाने,भरल्या मळवटाने तिने जगाचा निरोप घेणं म्हणजे तिचं कल्याण होणं! म्हणून ही प्रथा आली असावी तिला आदर देण्याची!
त्यामुळे अशा दिवंगत स्रीचा सन्मान हा एका विशिष्ट तिथीला होणे याला महत्व प्राप्त झालं! तिच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ सुवासिनीचं वाण दिलं जाऊ लागलं.समाजातल्या अन्य गरजू सुवासिनीला भोजनासाठी,साडीचोळीसाठी बोलावलं जाऊ लागलं.
माझे वडिल गेल्यानंतरही मी अविधवा नवमीला माझ्या आईच्या स्मरणार्थ काही ना काही करतेच.कारण तिचं स्मरण होणं आवश्यक आहे.
ते रोज होतंच परंतु त्या स्मरणाच्या निमित्ताने कुणालातरी गरजूला दान देणं,माझ्या मनातली कृतज्ञता जागी ठेवणं आणि वर्षातून एकदा आवर्जून तिच्या सौभाग्याचं स्मरण करणं!
सौभाग्यवती म्हणजे फक्त पती हयात असलेली स्री नव्हे! भग म्हणजे ऐश्वर्य,संपत्ती,भाग्य,शक्ती असे विविध अर्थ प्रचलित आहेत.या सार्यांनी युक्त ती सुभगा... सौभाग्यवती!
तिचं स्मरण मनात आहेच ते कृतीत उतरविण्याचा हा आदरणीय,पूजनीय कृतीरूप उपचार म्हणजे अविधवा नवमी! मग विधीवत् श्राद्ध करा वा सोयीनुसार दान द्या.
जे योग्य वाटेल,आपापल्या शक्यतेनुसार करता येईल ते जरूर करा.कारण ती असते म्हणून आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे.
© डाॅ.आर्या जोशी

No comments:
Post a Comment