Monday, 20 January 2025

Walking on the Edge

 एखादं पुस्तकं कसं मनाच्या कोपर्‍यात जाऊन बसतं नं! या पुस्तकाचं आणि माझं तसंच झालं! मला प्रवास आवडतो आणि प्रदेशांमधले,निसर्गामधले,माणसांमधले बदलही टिपायला आवडतात.सोबत कॅमेरा असला तर त्याच्या लेन्समधूनही काही न्याहाळणं आनंददायी असतं. प्रत्येकवेळी ते जमतं असं नाही मग अशावेळी अशी पुस्तकं हात देतात आणि आपणही त्यांच्यासह ऊखादा विशिष्ट प्रवास करुन येतो.

हे जरा अनवट,अनघड वाटांवरचं चालणं,एखादं व्रत घेतल्यासारचं! आणि या प्रवासाचं निवेदनही अतिशय प्रामाणिक आहे हे मला सर्वाधिक भावलं!

मी काहीतरी विलक्षण ध्यासाने झपाटून निघालो आहे आणि मला कुणाचीच आठवण येत नाही असं नाहि.प्रस्तुत लेखकाला आपल्या आईची काळजी जाणवते आहे.पत्नी आणि मुलीच्या आठवणीने तो सद्गदित होतो आहे हे मला अधिक महत्वाचं वाटलं!

काहीतरी भन्नाट करुन पाहताना त्याच्या अल्याड पल्याडचे अनुभवही आपल्या पोतडीत भर टाकत असतात.काही वेडे अनुभव आपल्याला शहाणं करतात.हे सारं या पुस्तकात आहे.

नर्मदा परिक्रमेवर आधारित पुस्तकं वाचायला मला म्हणूनच आवडतं.ध्येय निश्चित आहे पण प्रवासातली अनिश्चितताही आहे.आज कुठे रहायला मिळेल? काय खायला मिळेल? कुणी वाटेत भेटेल की नाही? या सार्‍या विचारांना मागे टाकत मैय्या आपल्याला तारून नेईल हा विश्वास अशा वर्णनांमधून वाचायला मिळतो.

वाॅकिंग आॅन द एज मधे सह्याद्रीपर्वतरांगांमधून केलेली भटकंती आहे.तिलाही अनिश्चितताही आहे.पण त्याजोडीने एक खुमारीही आहे.

या प्रवासात काहीवेळा कुठे रहायचंय,कुणाला भेटायचंय याची निश्चिती वाचताना जाणवली तरीही हे लक्षात येतं की लेखकाला त्याबद्दल शाश्वती नाही.तरीही तो चालतो आहे...

वळणं अनोळखी,प्रदेशही अनोळखी,माणसं तर त्याहूनही अपरिचित! पण तरीही तो पुढे जातो आहे.सह्याद्रीचं विविधरंगी सौंदर्य त्याला भर ग्रीष्माच्या तल्खलीतही सुंदर भासतं आहे.

कधी तो थकला आहे,कधी सुखावला आहे..काहीवेळा अमावास्येच्या रात्री अनोळखी मंदिरात एकटाच विसावला आहे तर त्याचवेळी पाणी न मिळाल्याने स्वतच्या शरीरातलं टाकाऊ पाणीही तो प्यायला आहे!

 या सार्‍या प्रवासाचं नियोजन,पूर्वतयारी,प्रत्यक्ष प्रवास,आडेवाटेवरल्या रानावनांमधे भेटलेली व आपलंसं करणारी माणसं आणि त्यांच्या गंमती, काही टप्यांवर ठरवून सोबत आलेले परिचित स्नेही,सवंगडी आणि या सार्‍याच्या हातचं न राखून केलेल्या प्रामाणिक नोंदी!

हे सारं मला भावलेलं.तुम्ही पुस्तक मुळातून वाचलंत तर तुम्हालाही नवं काही गवसेल! 

मी अजून शेवटच्या प्रकरणातच रेंगाळते आहे.माझा वाचनवेग पाहिला तर कदाचित सलग चार पाच तासात मी हे पुस्तक खाल्लंही असतं! पण हा प्रवास मलाही स्वतःबरोबर घडविणारं हे सोपं सरळ साधं पुस्तक मला अजूनही खिळवून ठेवतं आहे...त्यामुळे मी ते पुरवून पुरवून वाचलं आहे... मी ही अजून सह्याद्रीतच घुटमळते आहे या लेखकदादांसोबत!


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...