Monday, 27 January 2025

Unconditional.....

 "ऊठ आता शाळा आहे".

"काही अभ्यास वगैरे करायचा आहे की नाही?

"किती हा पसारा?

"आवर लवकर,झोपून राहू नको.

"काहीतरी मोठं ध्येयं ठेव आयुष्यात!

"तुला माझ्यासाठी वेळच काढायचा नसतो.तू सदैव तुझ्याच कामात"

"अग फोन वगैरे काही करशील की नाही कधी? असंच असतं तुझं!"

"सगळं जर मीच करायचं मग तू काय करणार?"

"ही जबाबदारी फक्त माझी आहे का? तुझं नाही का काही यात?"

"ती नं अशीच वागते.तिच्यात बदलाची सुतराम शक्यता नाही!!!टाळलेलंच बरं तिला/त्याला"

काय आहे हे सारं? अपेक्षांची एक न संपणारी यादी.

मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने ही वाक्य मोठ्याने किंवा मनातल्या मनात कुणा ना कुणासाठीतरी नक्कीच उच्चारली असणार आहेत.हो ना?

अपेक्षा.... आणि त्यांची पूर्तता न झाल्याने होणारी चिडचीड,येणारा राग,उचंबळून येणारा तिरस्कार,अवहेलना,दुःख आणि बरंच बरंच काही...

चार पायांची माणसं यातलं काही करत नाहीत बरं आणि म्हणून त्यांच्या प्रेमाला Unconditional म्हणतात.....

ती वेळेवर खाऊ मागतात,त्यांच्या नैसर्गिक वेळापत्रकात बदल झालेले त्यांना स्वीकारता येत नाहीत... बर्‍याचदा ही मंडळी कुटुंबाचा भाग असल्याने एक व्यावहारिक अडकलेपणही येतंच येतं.त्यांच्यामुळेही आपली चिडचिड होतेच.

पण अशावेळी हीच चार पायांची माणसं तुमच्या गळ्यात पुढचे दोन हात? पाय? टाकतात,तुमच्या पायांना अंग घासतात,चेहर्‍याने तुम्हाला ढुशी देतात,नखं न लागतील किंवा दात न लागतील अशी हळूच चावा घेतात..... आणि क्षणात आपण विरघळून जातो.अशा प्रेमाने सच्चा माणूस कधीच स्वत:ला थोपवू शकणार नाही हे प्रेम स्वीकारल्याशिवाय! कितीही भीती वाटली तरी एकदातरी तुम्ही या माणसांना थोडं घाबरत घाबरत का होईना पण हात लावाल,त्यांच्या जवळ बसाल कारण आपली त्यांच्याकडून काही अपेक्षा नसते.

"आज वेळेवर उठून क्लासला का गेला नाहीस"? हे आपल्याला बोक्याला आपण विचारत नाही...

"हे काय आज इतका वेळ काय कानात वारं भरल्यासारखं  सैरावैरा धावणं रानात?" असं आपण गाईला वा वासराला विचारत नाही.

"तू जरा तोंडात पिशवी धरून जा आणि खाली जाऊन दोन भाज्या घेऊन ये" असं आपण घरातल्या भूभूला म्हणत नाही... जरा ताजी बघून आण आणि भाव करुन पहा जरा काकांशी.

"स्वतःचा पिंजरा जरा स्वच्छ कर! उगीचच माझंही एक काम वाढतय अशाने" असं पाळलेल्या लव्ह बर्ड ला म्हणत नाही नं आपण!

कारण माहितीच असतं आपल्याला!

हे लेखन open ended ठेवलय.प्रत्येकजण यातून आपापल अर्थ लावेल आणि योग्य निष्कर्षाप्रत येईल असं वाटून हे लिहीलय...

असं जगता आलं तर आयुष्य अधिक उजळेल.

सव्वातीन वर्ष आमचं आयुष्य लख्ख उजळून निघालं आहे या निरपेक्ष प्रेमात.....



No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...