Monday, 3 February 2025

सहजमार्ग आध्यात्मिक शिबिर

 झालिया दर्शना# सहजमार्ग परिवाराचे एकात्म दर्शन#हार्टफुलनेस ध्यान शिबिर



50,000 (किमान पन्नास हजार) अभ्यासींच्या उपस्थितीत साजरा झालेला हार्टफुलनेस परिवाराचा भंडारा म्हणजे उत्सव.आदिगुरु लालाजी महाराज यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य! वसंत पंचमीचा त्यांचा जन्म असल्याने ३१जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात या आध्यात्मिक उत्सवात सहभागी होण्यासाठी मी कान्हा शांतिवनम् येथे गेले.(वसंत पंचमी भारताच्या प्रादेशिकतेनुसारव पंचांगानुसार वेगवेगळ्या    दिवसांमधे साजरी होते.)पण इथला वसंत परवा बहरला आहे...


कान्हा शांतिमवनम् ४०००(चार हजार)एकर क्षेत्रफळावरील हे एक  चिमुकले जगच आहे.आदरणीय कमलेशजी पटेल ऊर्फ दाजी यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली हा सर्व कामाचा विस्तार फुलतो आहे.


प्रबोधिनीच्या निमित्ताने शिक्षण,संशोधन,ग्रामविकसन,स्री शक्ती प्रबोधन,संघटन,राष्ट्रीय एकात्मता अशा विविध कार्यदिशांचा परिचय मला वीस बावीस वर्षात जवळून झाला आहे.विकीमीडिया उपक्रमाच्या निमित्ताने जगभरातील एकाच ध्येयाने प्रेरित झालेली मंडळी मला जवळून अनुभवता येतात,त्यांच्यासह काम करता येते.

आय.सी.सी.एस् चे पुन्हा सुरु झालेले काम म्हणजे जगभरातल्या संस्कृतींची आत्मीयता सांभाळणे.

या सार्‍या अनुभवाचे गाठोडे घेऊन मी इथे आले.


प्राणाहुती म्हणजे transmission हा पायाभूत अधिष्ठान विषय असलेली ही ध्यानप्रणाली आणि प्रेम हा त्याचा सर्वोच्च बिंदू.मी गेली दोन वर्ष हे ध्यानप्रयत्न करीत आहे.एका जन्माचे हे कामच नाही पण या जन्मात ओळख तरी झाली या संकल्पनेची.


विपश्यना,सुदर्शनक्रिया, हे शिकल्यानंतर ही नवी ध्यानप्रणाली प्रणोतीकडून शिकले.शेवटी सारं एकाच परब्रह्मापर्यंत जातं फक्त पद्धती वेगळ्या.

सामूहिक उपासनेचा अनुभव प्रबोधिनीच्या उपासना मंदिराला भारून टाकतो तसा इथे मला भारावलेपणाचा अनुभव दिला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित अभ्यासी बंधु भगिनींना पाहून.


इथल्या व्यवस्था,सोयी वाखाणण्यासारख्या आहेतच.इतक्या गर्दीत बहुजनमनाला शिस्त व वळण लावणे जरा कठीण पण प्रयत्न सुरु असल्याचे नक्की दिसले.


अल्पशिक्षित वा अशिक्षित शेतकरी समाजापासून उच्चविद्याविभूषित गर्भश्रीमंतांपर्यंत सगळे इथे एका छत्राखाली एकत्र येतात व ध्यानाचा सराव करतात.ध्यान कसे झाले यापेक्षा इथल्या माणसांमधले विविधांगी पैलू न्याहाळण्याची जी संधी मला मिळाली ती मला विशेष भावली आहे.


इथे काय नाही? सारंच आहे.त्याबद्दल उत्सुकता असेल तर गुगलवर सर्व इत्थंभूत माहिती आहेच.


मला आवडलेलं आणि स्वतंत्रपणे आयोजित छोट्या वर्गांपैकी एक वर्ग म्हणजे breathing techniques.विष्णूदादाने थोड्या वेगळ्या म्हणजे हार्टफुलनेस साठी उपयुक्त प्राणायाम थोडे सोपे,Inst सहज असे शिकविले.हे सत्र मला आवडलं किंबहुना ते मला शिकायचं होतं ते साधून गेलं.


त्यानंतर आवडती जागा अर्थात ग्रंथालय.अनेक सुंदर पुस्तकांनी,विविध भाषांमधे विवाध विषय असलेली व सहजमार्ग विषयक विवेचन करणारी पुस्तकं.


पुनः पुन्हा अधोरेखित करावंसं वाटतय ती संधी म्हणजे भूषा,भाषा,भोजन,भजन या सार्‍यात वैविध्य असलेली जगभरातील मंडळी भक्ती नावाच्या या एका संकल्पनेखाली एकत्र येणं अद्भुत आहे.कान्हा शांतिवनम् हे जगातील सर्वात मोठे ध्यानकेंद्र आहे.


प्रत्येकाचे गंतव्य वेगळे आहे पण कोणतातरी रस्ता आपण पकडतोच.चार्वाक आहेत तसेच द्वैती अद्वैतीही आहेत....भारतीय ज्ञान परंपरेची हीच तर मजा आणि वैशिष्ट्य आहे.मला जे भावेल,जे माझ्या प्रकृतीला झेपेल ,पचेल,रूचेल आणि सरतेशेवटी माझ्यातल्या माणूसपणावर जे हळुवार फुंकर घालेल ते आत्मसात करावं व आपल्या आतच आपल्याला शोधावं!


माझ्या शोधात मला खासकरून माझ्या आणि चार पायांच्या दिवंगत लेकराचं नातं सापडलं.त्याचं नुकतंच निधन झालेलं आहे जे काळीज पोखरून गेलं आहे.माझ्यातली बगिराची आई अस्वस्थ आहेच पण मी त्याच्यावर जे प्रेम केलं ते या ध्यानप्रक्रियेच्या दोन वर्षांच्या अभ्यासातून अधिकच वाढलं होतं.जे त्याचं होतं ते तो घेऊन गेला आहे... 


आज माझी ओंजळ रिती आहे असं इथे येऊनही जाणवलं कारण आपल्या हृदयातला प्रेमाचा ओलावा समजून घेण्यास दोन पायांचे जीव तोकडे पडणारच आहेत पण आपण आपल्या हृदयातलं प्रेम असंच सर्वांना वाटत राहू. प्रेम या शब्दामधे जी आध्यात्मिक उदात्तता आहे ती यात अभिप्रेत आहे.ज्याला त्यात भिजायचंय त्याने भिजावं,ज्याला कोरडं रहायचं असेल त्यावरही वर्षाव करीत रहा ही शिकवण घेऊन मी इथून मार्गस्थ होते आहे.


@डाॅ.आर्या जोशी

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...