छावा पाहिला.
महाविद्यालयात असताना वढूला व तुळापूरला गेले.तिथे संभाजीराजे भेटले. छावा वाचली,संभाजी वाचली तेव्हाही ते भेटले.
लग्न झाल्यावर कसबा संगमेश्वरचा लक्ष्मी नृसिंह सासरचे कुलदैवत असल्याने तिथे गेलं की संभाजीराजे भेटतात!
आजची भेट वेगळी होती.आअल्या पुलाखालून बरंच पाणी वाहिलं की जाणिवाही सशक्त होतात,संवेदना अधिक अंतर्मुख व्हायला भाग पाडतात!
कादंबरी प्रमाण? खरा इतिहास कोणता?
कोणता चित्रपट खरा?
कोणता अभ्यासक खरा?
मला एकही प्रश्न पडलेला नाही आणि मला तो पाडून घेण्यात रसही नाही...कारण
इतकं सारं त्यांनी सोसूनही आपण काय बोध घेत आहोत त्यातून? हा एकच प्रश्न मला पडतो आहे... आणि या प्रश्नातच वरच्या प्रश्नांची उत्तरं दडलेली असावीत....
स्वराज्य ही दृष्टी आहे,स्वराज्य हा विचार आहे ती केवळ भूमी वा भौगोलिक प्रदेश नव्हे हे शिवरायांचं म्हणणं! ते अधिक महत्वाचं.तो खरा कसा होता माहिती नाही...पण इतिहास थोडाफार खरा असेलच नं! कागदपत्रं थोडंफार बोलत असतीलच नं! त्याचं बलिदान महत्वाचं का ठरतं तर त्याने वडिलांनी आयुष्यभर प्राणपणाने सांभाळलेला विचार शेवटपर्यंत शरीर मन बुद्धीत धारण केला आणि त्यामुळेच त्याला संगमेश्वरला पकडण्यात शत्रू यशस्वी झाला!
आदर्श विचार जगणं खूप कठीण! ते जगताना अवतीभवतीची माणसं त्यांचे स्वार्थ सांभाळण्यात मग्न असतील तर काय होईल हे यात दिसतं! मग घरचे असोत वा दारचे असोत.आदर्शवाद जगलात तर साखळदंड हातात! खरे बोलणार्याची जीभ छाटली जाईल! द्रष्टेपणा दाखविणार्याचे डोळे फोडले जातील,त्यातली स्वप्न अगाराने बेचिराख केली जातील! तो डरकाळी फोडेल पण ती केवळ थरकाप उडवेल?सिंहाचे किती बछडे जन्म घेतील त्यातून?
चित्रपट या विषयी मला काही म्हणायचं नाही आहे.अक्षय खन्ना व विकी कौशलच्या अभिनयाला सलाम इतकं कौतुकाने नक्की म्हणेन प्रेक्षक म्हणून!
पण असे चित्रपट माध्यमांवर येतात विचार करायला लावण्यासाठी,त्यातील ध्येयवाद समजून घेण्यासाठी आणि तो आचरण्याचा किंचित प्रयत्न करण्यासाठी! नाहीतर बलिदान व्यर्थ आहे!त्यामुळे त्या सहनशीलतेचा अंत आपणही अधिक पाहू नये आणि चूक बरोबर,आरोप,प्रत्यारोप,खरे खोटे,मी हुशार की तू शहाणा यापलीकडे जाऊन किंचित जे गवसलेलं असतं त्यातून कृतीत सकारात्मक बदल घडवावा,देह देशासाठी लावावा आपापल्या परीने! हे होणे शक्य आहे या आशेची पालवी मनाला फुटली आहे.कारण नेहमी चित्रपटगृहातून गप्पा मारत ,खिदळत बाहेर पडणारी माणसे सुन्न होऊन,काहीही न बोलता पडद्याचा निरोप घेणार नाहीत!
No comments:
Post a Comment