Saturday, 22 February 2025

अमृतकण वेचताना भाग ७

मी महाकुंभला पोहोचले ते आमच्या गाडीने.विमानाचे दर आमच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यातून आमचं नियोजन बर्‍यापैकी उशीरा सुरू झालं होतं २६ जानेवारीनंतर.ICCS कडून जसजसे तपशील मिळत गेले तसतसं आमचं विचारचक्र सुरू झालं.आमची नावं कळवली गेली संस्थेला नोंदणीसाठी.

यातच स्वातीचा मला संदेशआला, Aaryaa, Interested in Mahakumbha? ती भिडू शोधतच होती. मी तिला तत्काळ फोन लावला आणि संदीपजी कवीश्वरांशी बोलून स्वातीची व्यवस्थाही होऊ शकते आमच्यासह याबद्दल आश्वस्त झाले आणि तिला म्हटलं चल तू ही आमच्यासह!

या दोन चक्रधरांनी ३५०० किलोमीटरचा प्रवास पार केला.महामार्ग तर अप्रतिमच आहेत मग तो समृद्धी असेल किंवा मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश असेल.त्यामुळे नागपूर,भेडाघाट,प्रयागराज,इंदौर,उज्जैन,माहेश्वर,परत पुणे असा महामार्गीय आनंद घेता आला.

"चालव की तू ही आर्या गाडी" म्हणत यांनी मला आग्रह करून पाहिला पण बगिराच्या अचानक जाण्याने हललेलं माझं मन अजूनही ताळ्यावर आलेलं नाही! कुठे उगीच वाहन चालवायची हौस पुरवा! नको! त्यापेक्षा तुम्ही चालवा,मी निवांत बसते! हा मंत्र मी अखंड जपत राहिले.

चौघांच्या चार तर्‍हा असल्या तरी अनेक वर्षांच्या मैत्रीमुळे गोष्टी सोप्या होतात.स्वाती मुळात आशुतोषच्या कंपनीतली मैत्रीण! मग ती माझीही मैत्रीण झाली त्यामुळे मोकळेपणा आला नात्यात इतक्या वर्षांच्या सहवासामुळे!यामुळेच हा आयत्यावेळी ठरलेला प्रवास सर्वार्थाने सुकर झाला.

तहानलाडू,भूकलाडू सोबत घेऊन आम्ही निघालो.तिघांच्याही मोबाईलवर गुगल मावशीने जी काही धमाल उडवून दिली आहे ती आठवली तरी पोट दुखेपर्यंत हसत राहू अजूनही!

कळसाध्याय म्हणजे हे आता ओपन सिक्रेट आहे पण प्रयागराज ते इंदौर हा सतरा तासांचा प्रवास आम्ही रात्रभर केला ज्याचं श्रेय या दोघांचं आहे.त्यातही रात्री सहा तास गाडी स्वातीने इतकी छान चालवली की कौतुक नक्कीच व्हायला हवं! मुली,महिलाही हल्ली सराईतपणे चारचाकी काय विमानही चालवतात,अगदी रेल्वे,बोटीही चालवतात! त्यामुळे त्याची अपूर्वाई वाटत नाही हे खरं पण तिने खरोखरीच अतिशय जबाबदारीने आणि सावधपणानेही गाडी चालवली.आम्ही दोघींनी सर्व प्रवासात इतके पळसवृक्ष टिपले आहेत की विचारता सोय नाही!

पूर्वी आम्ही काही ट्रेकस् एकत्र केले आहेत.हा फोटो असाच आहे राजगडचा जो आम्ही २००७-०८ मधे केला आहे.मी बहुधा तेव्हाच जाहीर केलं होतं की प्रयागराजला जाऊ तेव्हा मी मुळीच गाडी चालवणार नाही,तुम्हीच चालवायची गाडी!

फोटोमधील या दोघांच्या भावमुद्रा पाहून ते त्यावेळी काय म्हणाले असतील याचा अंदाज तुम्हीच बांधा!!! हा हा हा!
फक्त या फोटोत नसलेली आमची लेक कालांतराने आमची प्रवासी सोबतीण झाली.एवढा  मोठा प्रवास तिनेही एंजाॅय केला! 

हे दोघेही Ecological Society चे विद्यार्थी त्यामुळे प्रवासात दिसणारी झाडं,निसर्गाची बदलती रूपं,मातीचे पोत,फुलं,फळं,शेती,पक्षी,घरं,पोशाख असे बरेचसे विषय गप्पांमधे येत होते. थोडक्यात प्रदेश बदलला की काय काय बदलतं! आणि प्राप्त परिस्थितीनुसार माणसाच्या मन बुद्धीचंही पोषण कसं होत असेल,त्यांची आव्हानं काय असतील? कोणत्या गोष्टी त्यांना सुकर होत असतील? अशाही गप्पा झाल्या. माझ्याही ज्ञानात पुष्कळच भर पडली या आठ दिवसात.स्वाती ही इंगळहळ्ळीकर सरांसह काही प्रकल्प करते तसेच काही संस्थांसह सुद्धा ती पर्यावरणविषयक काम करते भारतभर फिरून.त्यामुळे निसर्ग आणि संस्कृती याविषयी तिचे आकलन,अनुभव,निरीक्षणं आणि माझे वाचन,अनुभव अशाही भरपूरच गप्पा झाल्या.
फालतूचे विनोद गप्पांमधे आले नाहीत आणि एक क्षण कुणीही काही न बोलता विनोद समजल्यावर सगळे हसले नाहीत तर तो प्रवास कसला! असा दंगाही प्रवासात भरपूर होतोच आणि आम्हीही तो केला!

चार जणांच्या आवडीची गाणी आलटून पालटून लावणे असा एक अलिखित नियम आम्हीच ठरवला होता.अर्थात कल थोडा धाकट्या सदस्याकडे होता  आणि कंट्रोलसुद्धा!पण तरीही वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आम्ही ऐकलं! Spotify ला त्याबद्दल धन्यवाद!

महाकुंभात मी सत्रांमधे असताना स्वाती दीपान्विताबरोबर असल्याने मी पूर्णतः निश्चिंत होते ही जमेची बाजू!
एकूणातच आधी मी एकटीच,मग लेकीला तिच्या आत्याकडे ठेवून आम्ही दोघेच जाण्याचे नियोजन,मग लेकही सोबत येणे आणि त्यात स्वातीही जोडली जाणे अशी चौकडी जुळणे हा ही योग होता!

वाटेतली खाऊपिऊची दुकानं,रात्रीच्या प्रवासात मध्यरात्री सव्वादोनला घेतलेला चहा (अहाहा), जिथे जे मिळेल ते  फार चिकीत्सा  न करता मागवणे व उदरभरण करून पुढे मार्गस्थ होणे हे सारं मस्त जुळून आलं.

सर्वात महत्वाचे धन्यवाद आमच्या जिमनीला! फोर व्हिल ड्राईव्ह जीप आहे आपली! कधी वापरणार ती ज्यासाठी ती बनवली गेली आहे त्या हेतूसाठी! असं म्हणत जोशुबुवांनी जीमनी लाही कुंभदर्शन घडवले.ताम्हान्याच्या रस्त्यांवर,शेतीमालाची ने आण करण्यासाठी सोपी म्हणून फार फॅन्सी कार न घेता ही जीप घेतली त्यालाही वर्ष उलटून गेलं होतं.पण जीमनूताईंनी पोटातलं पाणीही हलू दिलं नाही आमच्या की प्रवासात कुठलाच त्रास दिला नाही त्याबद्दल तिचेही आभार मानायला हवेतच!

गंगा ब्रीजवरून दिसणारी प्रयागराज नगरी आणि तिथले दिवे पाहून आमच्या चौघांच्याही तोडून एकच हर्षोद्गार बाहेर पडला आणि हेच या प्रवासाचं आणि आनंदाचं गमक आहे!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...