मी संस्कृत संस्कृति संशोधिकेत काम करीत असताना एका शिक्षक प्रशिक्षणासाठी श्रीकृष्णभावनामृत संघाचे काही उपासक शिक्षक आले होते. समोर सभागृहात त्यांचं प्रशिक्षण सुरू असताना मधल्या वेळात आमच्या विभागाबाहेर संत्रिका अशी पाटी वाचून ते कुतूहलाने आत आले.विभागाची माहिती देताना मला ते म्हणाले "आमच्याकडेही संत्रिका आहे" म्हणून कुतूहलाने आलो.संकीर्तन,संस्कृती,संस्कार अशी संत्रिका आमच्याकडेही आहे.त्यानंतर खरंतर या जगाविषयीचं किंबहुना पंथाविषयीचं कुतूहल वाढलं आणि सुदैवाने आमच्या सहनिवासातच हे सारं दरवेळी अनुभविण्याची संधीही मिळत गेली.
कृष्ण अवतारांचे उत्सव म्हणजे आमच्या सहनिवासातील अनंतादीदीची धांदलच असते.आमच्या सहनिवासात अशी दोन सुंदर देवालये आहेत.एक माझ्या प्रिय उषाताई जोगळेकर आजींचं आणि दुसरी माझी प्रिय सखी अनंतादीदीचं!
आजींकडे शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरामुळे एक वेगळंच पावित्र्य आहे आणि अनंतादीदी आणि प्रसन्नादादा खमितकरांकडे श्रीकृष्ण भावनामृतसंघाची परंपरा!
दीदीला भेटल्यावर हमखास ती हरे कृष्णाच म्हणणारच! माझी लेक तिला हरे कृष्णा मावशी असंच म्हणते!
आपल्या लहानशा वास्तूत तिची कायम धांदल उत्सवाच्या वेळी!गोकुळाष्टमीला तर हरि बोल! आणि राधे राधे चा जयघोष त्या साधक परिवारातून ऐकायला मिळणं ही पर्वणीच असते.या सार्यांकडे पाहिलं की समर्पणभाव अगदी ओतप्रोत दिसतो.
बंगाल प्रांतातील पारंपरिक मृदुंग ज्याला खोल असंही म्हटलं जातं त्याच्या तालावर भजनं गात नृत्याचा आनंद घेणं या परिवारात आवर्जून पहायला मिळतं.आमच्या जवळ असलेल्या विरंगुळा केंद्रात सहसा त्यांचे उत्सवादरम्यानचे संकीर्तन,प्रवचन,प्रसाद हे सर्व कार्यक्रम संपन्न होतात.
दर उत्सवाला मग गोकुळाष्टमी असो वा रामनवमी,नृसिंह जयंती ती स्वतः सकाळी छोटेखानी कागदावर लिहीलेलं आत्मीय आमंत्रण घेऊन येते.तिला जमलं नाही तर उपासक परिवारातील कुणालातरी ती पाठवतेच घरोघरी आमंत्रणासाठी! ती आली की धांदलीतच! "अग आत ये!" "नको नको गडबड आहे" असं म्हणत जिना उतरतंच ती नक्की ये असं सांगून जाते.
माझ्या घरातल्या भिंतीवरचं चैत्रांगण तिला फार आवडतं आणि मागच्या गोकुळाष्टमीला तर आमचा बगिरा साक्षात् तिच्याकडून आमंत्रण स्वीकारायला आल्यासारखा तिच्यासमोरच येऊन बसला! क्षणभर ती दचकली पण नंतर म्हणाली " Oh you have this real Krishna in your family! How elegantly he is accepting my invitation " ती भलतीच खुश होऊन गेली त्यावेळेला.
तल्लीन होऊन कृष्णभक्तीत रमलेले हे उपासक पाहणं हा अनुभवच वेगळा असतो.यावर्षी नववर्षाच्या शोभायात्रेतही त्यांच्यासह अभंगाच्या आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत नृत्यानंद घेता आला.
एखादी परंपरा अशी काही शतकं जेव्हा माणसांच्या रूपाने जिवंत राहिलेली पहायला मिळते तेव्हा त्या ईश्वरापेक्षाही मानवातल्या त्या ऊर्जेला,उत्साहाला आणि श्रद्धेला वंदन करावं वाटतं.आज मी अनंतादीदीला नमस्कार केल्यावर ती नाहीच म्हणाली तो स्वीकारायला कारण तिच्यादृष्टीने मी एक यज्ञपरंपरा शिकविणारी महिला आहे आणि ते ती सार्यांना खूप प्रेमाने सांगत असते.पण मी तिला म्हटलं" तुला मी जी श्रद्धा जगताना अनुभवते नं नेहमी त्या श्रद्धेला आणि सेवेला हा नमस्कार आहे!"
No comments:
Post a Comment