त्याचं माझं खास मैत्र आहे......असं म्हणतात की तो फुलला की चाळीस दिवसात पाऊस येतो.... मला खुळीला ते समजत नाही....मला एवढंच समजतं की माझ्या आवडत्या पावसाला घेऊन तो येणार आहे.....त्याचं बहरणं असं हळूहळू अनुभवायला मिळतं.... तो ही आवडता आणि पाऊसही!
त्याचे घोस,त्याचे लोलक,शब्दशः प्रत्येक फुलातून त्याचं आसुसून जगणं आणि मी ते पहातच राहणं....
अग्निशिखा जशी मला पहिल्यापासून वेड लावते तसं याचंही आहे...
त्याचं माझं मैत्र नक्की कधी जुळलं आठवत नाही....पण माझ्या रोजच्या जायच्या यायच्या वाटेवर तो उभा असल्याने तिथेच भेटला असावा प्रथम! आताती अनेक वर्षांची रूळलेली वाट बदलली पण मग तो मला माझ्या अन्य वाटांवरही दिसू लागला...मीच मला किती सीमित केलं होत! त्याचं माझं मैत्र मी एका विशिष्ट प्रदेशातच अडकून ठेवलं होतं!!! मग कळलं की तो माझ्यापेक्षा शहाणा आहे... मी जाईन तिथे आहेच तो उभा माझ्यासाठी!!!
त्याला कसं आणि किती टिपावं हे पण समजत नाही आता! डोळे भरून पहावं आणि बस्स!!!! माझ्यासारखेच असंख्य त्याच्या प्रेमात! पण तरी त्याचं माझं खास नातं आहे! जे फक्त त्याचं माझं आहे!आणि तीच आमच्या नात्याची गंमत आहे!
पहिल्या पावसात त्याचे झुबकेदार लोलक भिजणार आणि मी ही भिजणार!त्याची पिवळी सुंदरशी फुलं जमिनीवर सडा घालतील...ओलीकंच होतील...मातीच्या गंधाशी एकरूप होतील....तोच दरवळ माझ्या मनात साठवून ठेवेन मी..पुन्हा भेटेलच तो मला....नव्या वळणावर...माझी वाट बदलली तरी माझ्यासाठी उभा!!!!

No comments:
Post a Comment