Wednesday, 17 May 2017

# उत्तरायण#

 आज दापोलीच्या परतीच्या प्रवासात आयपाॅड वर गाणी ऐकण्याचा निवांत उद्योग केला मी.अचानक एक गाणं लागलं माझ्या माहितीतलच पण खूप दिवसात न ऐकलेलं.धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना! वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना! त्या चित्रपटाची कथा आठवलीच पण त्याचबरोबर आठवले काही क्षण ज्यांचा भागीदार होण्याचा आनंद मला लाभला आहे.पौरोहित्य वर्गात एक ताई यायच्या.छान मोकळ्या स्वभावाच्या.त्यांच्या यजमानांबद्दलही खूप सांगायच्या काय काय.एके दिवशी कळलं की त्यांचे यजमान अचानक गेले आणि त्या वेळी ताई त्यांच्यासोबत नव्हत्या. आम्ही मंडळी भेटून वगैरे आलो पण नंतर भेट नाही झाली दीडेक वर्ष. एके दिवशी मला ताईंचा फोन आला की तुझ्याशी जरा बोलायचयं. आम्ही संत्रिकेतच भेटलो. आधी त्यांनीमला मिठी मारली कडकडून आणि मग म्हणाल्याकी अगं मी प्रेमात पडली आहे! मला नक्की काय react व्हावं तेच उमजेना.यांचं वय 70. आता या पडल्या प्रेमात 77 वर्षाच्या त्यांच्या मित्राच्या. ज्येष्ठ नागरिकांच्या गटात ते भेटले.आणि त्या आजोबांनी यांना propose केलं.मुलांशी बोलून दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि ते विधिवत व्हावं अशी ताईंची इच्छा होती.नंतर त्या त्यांच्या मित्राला घेऊन आल्या आणि आम्ही तिघांनी मस्त गप्पा मारल्या. वयोज्येष्ठ अनुभवी पुरोहित येतील अशी व्यवस्था केलीआणि मी शुभेच्छा द्यायला येईन असं म्हटलं.त्यानंतरही ते दोघे स्वतःहून भेटायला आले लग्नाआधी. माझ्यासाठी एक सुंदर भेट घेउन.कारण त्यांच्या भावनांची खिल्ली न उडवता मी त्यांना समजून घेतलं अशी त्यांची भावना होती.खरंतर आयुष्याच्या संध्याकाळी असा निर्णय हीमाझ्यासाठी अपूर्वाई होती. त्या दोघांना पाहिलं की वाटे की हेआधीच का नाही भेटले एकमेकांना तरुणपणातच.त्यावर ते काका मला म्हणाले होते की आयुष्याची वर्तुळं पूर्ण झाल्यावर आता केवळ भावनिक पातळीवर एकमेकांचे राहण्याचे हे क्षण आहेत.. ते निघताना मी त्या दोघांनाही घट्ट मिठी मारली आणि नमस्कार केला.खालपर्यंत सोडायलाहीगेले पण ते रीक्षात बसतानाही मला नीट दिसले नाहीत कारण माझेच डोळे नकळत भरुन आले होते,..,.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...