सिंहगड
माझ्या घरातून दिसतो तो.सकाळ संध्याकाळ नव्हे रात्रीसुद्धा हाक देतो तो.
रखरखत्या उन्हात,शीतल चांदण्यात,मुसळधार पावसात, धुक्याची शाल लपेटलेला, ढगांना गुरफटून बसलेला... कित्ती कित्ती लोभसवाणी रूपं आहेत त्याची...
त्याच्या थोडाच शेजारी असलेला तो बटाटा म्हणजे पोटॅटो पाॅईंट माझ्या आठवणीच्या कुपीत बंद आहे.
पाचवीत असताना पहिल्यांदाच सिंहगडला भेट दिली. शाळकरी वयात माझ्यासाठी दादाबरोबर ऊत्साहाने वर चढून जाणं ही गंमतच होती. खूप खूप दमत ,हाशहुश करत वर पोचताना निसर्ग वगैरे पहायचा असतो हे त्यावेळी कळतच नव्हतं. भजी आणि ताक,देवटाकीचं पाणी आणि गडाला फेरी मारून मस्त परत येताना पिठलं भाकरीची ढेार देऊन गड उतरले. आजही त्याची आणि माझी पहिली भेट आठवते.
काॅलेजच्या दिवसात सहकुटुंब जाण्याचा योग आला.वयस्कर मंडळी बरोबर असल्याने घाटरस्त्याने थेट गाडीतून गाडीतळावर पोहोचणं झालं. सर्वांच्या गतीने आणि गप्पांतून सिंहगड पहायचा असल्याने त्यावेळी तिथले एक स्थानिक मार्गदर्शक दादा सोबत घेऊन गड पाहिला.तानाजींच्या पुतळ्याला नतमस्तक होत पोवाडे,शौर्यगाथा ऐकत ही भेट संपन्न झाली होती.
मे महिला असल्याने काळी मैना, थंडगार ताक दही आणि वांग्याची भाजी भाकरी असं मस्त जेवण झालं. यावेळी रात्रीच्या अंधारात खोर्यातले लुकलुकते गाव आणि उडळलेला परिसर मी प्रथमच पाहिला आणि माझ्या मनावर सिंहगड या नावाचं गारूड रुंजी घालू लागलं...
त्यानंतर अनेक वर्ष आमची भेटच नाही झाली...
इतक्या वर्षाँनी गेले नंतर ती त्या सुंदर बटाट्यावर जाऊन बसले... एक अनोळखी पण म्हटलं तर थोडा परिचीत मित्र मला तिथे घेऊन गेला. कालांतराने त्या बटाट्यावर बसलेल्या युवकाला मला स्वयंपाकघरात बटाटे चिरून द्यावे लागले आणि गेली अनेक वर्षे आता तो हे करतो!!!! त्या बटाट्याच्या विशाल शिळेवर बसल्यावर विस्तीर्ण परिसर नजरेत भरतो. दरीची अथांगता भासते. वरती आभाळाला हात टेकतील की काय असं वाटतं. वार्याच्या भणाणत्या वार्याखेरीज केवळ आपल्याच श्वासाची लय ऐकू येते. मौनात सर्व जग सामावून घेण्याची सकारात्मकता त्या जागी बसून उरी साठवता येते.
नंतरच्या सिंहगडाच्या भेटी या आमच्याच झाल्या.
मनात आलं उठा आणि जेवायलाही गडावरच जा. तिथे हाॅटेल चालविणारं एक कुटुंबही आमच्या परिचयाचं झालं.आम्ही तिथेच जेवायचो नेहमी...
कुडकुडत्या बोचर्या थंडीत, मुसळधार पावसात गारा तोडावर सपासप बसताना त्या घाटातून सहचरासह ते वातावरण अनूभविण्याची मजाच और होती...
उन्हाळ्याच्या सुरुवातीला फुललेला गुलमोहर आणि माझा आवडता धगधजीत ज्वालेचा भास निर्माण करणारा पळस या वाटेत हमखास भेटतो...
डोंगर रखरखीत भासू लागतात,झाडे निष्पर्ण होतात पण त्यातही गडाचं सौंदर्य अधिक भासतं.
गडाला फेरी मारणे,बुरुजावर बसून भणाणता वारा पीत म्हटलेली गाण, एखादं फिरायला आलेलं चिमुकलं दुडदुदू धावताना अनुभवताना येणारी मज्जा, युवक युवतींचे घोळके असं खूप काही...
कधीतरी मित्र परिवारासोबत चढलेला गड!वाटेत भेटणारे हौशे नवशे गवशे अनुभवणं. मित्रपरिवाराने अनुभवलेलं व्हॅली क्राॅसिंग, कुटुंबियांसमवेत झालेल्या नियोजित आखीवरेखीव भेटी, लहानग्या भाच्याला तानाजी कडा दाखवताना पळत पळत त्याच्याबरोबर केलेली गडफेरी..
कित्ती कित्ती आठवणी...
मधल्या काही वर्षात छायाचित्रण शिकले त्यावेळी कॅमेर्यातून माझा लाडका सिंहगड टीपायलाही शिकले,तिथले सुंदर पक्षी नजरेत कैद केले.
बटाट्यावर जाऊन बसलेल्सा आमच्या जीवनात आता एक टुणटुण छोटी बटाटू आली. मित्रांच्या सोबतीने दिला दुलईत लपेटून धो धो पावसात गड फिरलो. तिचा बाबा तो गोंडस गुबगुबीत गोळा दुपट्यात घट्ट बांधून पावसात भिजताना आणि बटाटूच्या दात नसलेल्या बोळक्यातून हसू उमटताना मी त्यांना कल्याण दरवाजात माझ्या नजरेतच कैद केलं आहे....
पुन्हा तो खुणावू लागला आहे...
ये नं नव्याने भेटायला... आता तुझ्यातल्या कवयित्रीला भेटायचय.,, त्यानिमित्ताने तुझ्या माझ्या स्नेहबंधाची उरी जपलेली खूण छंदात बांध आणि रिते कर भावनांचे घडे.....
Tuesday, 15 January 2019
सिंहगड माझा सिंहगड
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment