धरती म्हणे मेघाला
चल जाऊया राऊळीलाविठूरायाच्या दर्शनाला
आली एकादशी!
बरसून तृप्त होऊ
टिळा मृद्गंधाचा लावू
भगवी पताका नाचवू
आली एकादशी!
पाने टाळ वाजवतील
वीजेचा पखवाज घुमेल
खळखळाटी वीणा झंकारेल
आली एकादशी!
आले विठुचरणासी
पाहिले रखमाराणीसी
पाहत राहीले आश्चर्यासी
आली एकादशी!
घन सावळा विटेवरी
धरती तृप्त उभी दिंडिरी
काय ही किमयागरी
आली एकादशी!
मी-तू पण एक झाले
द्वैत अवघेचि विरघळले
मेघ- धरती संतोषले
आली एकादशी!
आर्या
No comments:
Post a Comment