Monday, 23 November 2020

 अवतीभवती उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी वावरलं की आपलं मर्यादित जग लक्षात येतं.खरंतर फेसबुक हे माध्यम वापरतानाच मला विविध गटांवर हे पहायला नव्हे अनुभवायला मिळालं की या माध्यमावर विविध प्रकारची लोकं भेटतात.. ओळखीची तर असतातच पण अनोळखीही तितकीच भेटतात. अनेक प्रकारचे छंद, कला, आवडी ही माणसं जपत असतात, आपल्या क्षमतेनुसार आपापल्या ठिकाणी प्रयत्न करत असतात.मग ती एखादी पाककृती असो, रांगोळी असो वा लहान लेकराने काढलेलं चित्र असो. पण याचं कौतुक करण्यासाठी मनही तितकंच मोठं असावं लागतं. आणि त्याआधी हे स्विकारण्याचीही क्षमता असावी लागते की या जगात मीच केवळ परिपूर्ण नाही. माझ्या विशिष्ट वर्तुळाच्या बाहेर जाऊन मला हे स्विकारतं येणं की माझ्यापेक्षाही कुणीतरी सरस आहे आणि त्याचं ते मोठेपण मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही माझ्याकडे असला पाहिजे. जगाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येकच माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतो. आपल्याला जे सर्वांसमोर मांडावंसं वाटतं ते मांडतोही...  

मधे कुठेतरी वाचनात आलं की एका व्यक्तीने आपल्याला लाईक देणारे कोण आहेत याचा आढावा सातत्याने घेतला आणि लक्षात आलं की बाहेरची माणसं मनमोकळं आणि निरपेक्ष कौतुक करतात पण नेहमीची अवतीभवती वावरणारी माणसं दखलही घेत नाहीत. हा मानसशास्रीय विचार आवडला आणि विचार करायला प्रवृत्तही करून गेला.

माझं वर्तुळ मला मोठं करता आलं आणि दुसर्‍यात जे माझ्यापेक्षा चांगलं आहे त्याचं मनापासून कौतुक करण्याची क्षमता माझ्यात आली तर आपलंही आयुष्य उजळेल. नुकताच मी फर्जंद चित्रपट पाहिला. (चित्रपट आणि त्याची कथा,  खरा खोटा इतिहास याबद्दल मी नोंदवत नाही आहे.)पण त्यात काहीतरी सापडून गेलं. त्यात तीन प्रकारची शस्र वापरणारी माणसं आपणच कसे श्रेष्ठ हे सांगत एकमेकांवर कुरघोडी करत होते. पन्हाळ्याच्या मोहिमेचे नेते कोंडाजी फर्जंद त्यांना जाणीव करून देतात की आपल्याला आपल्या क्षमता एकत्रितपणे स्वराज्यासाठी वापरायच्या आहेत.आणि चित्रपटात युद्धाच्या प्रसंगात ती पूरकता दिसलीही आहे. चित्रपटात आपण मनोरंजन म्हणून जे ऐकतो ते सोडून देतो पण हा विचार जरी चित्रपटातला असला तरी मला त्यातनं खूप काही विचारधन मिळालं...  थोडीशी प्रगल्भता आयुष्यात सर्वांनाच जगता आली तरी आयुष्याचं सोनं होईल...

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...