कांतारा म्हणजे वन... वनाची देवता,जनाची देवता आणि जनांच्या मनाची देवता म्हणून स्थान मिळवून असलेली विविध लोकदैवते दक्षिण कर्नाटकात विशेषत्वाने पहायला मिळतात.आपली संस्कृती कृषीशी संबंधित असल्याने क्षेत्रपालाची विविध रूपे या प्रांतात पूजली जातात.अशी दैवते नक्की किती व कोणती हे सांगणंही कठीण आहे पण त्यातल्या त्यात अधिक मान्यता पावलेली लोकदैवते सण उत्सवांचा विशेषत्वाने भाग होतात.
कर्नाटकातील बौद्ध संप्रदायाचा प्रभाव यावर Ph.D केलेले इतिहास आणि कन्नड भाषेचे निवृत्त प्राध्यापक टी.वसंतकुमार यांच्या घरी काल चित्रीकरण झाले.त्यांच्याशी माझ्या अभ्यासविषयाच्या खूप गप्पा झाल्या.विकी व्यासपीठासाठी यातून आणखी काय काय करता येईल याविषयीही आम्ही बोललो.
नारळ व सुपारीच्या बागांमधे दडलेल्या घरातील मुलगा चिदानंद, तुळू विकीपिडिया संपादित करतो.त्याच्या घरी काल दुपारी विशेष भोजन झाले.त्याच्या आईने केवळ माझ्या एकटीसाठी शाकाहारी जेवण तयार केलं होतं अन्य सदस्य मांसाहार करणारे होते.तिथलं प्रेम,आतिथ्य,आपुलकी ही भाषेला ओलांडणारी मूल्य माझ्या मनात घर करून गेली.(माझ्या बग्गुला लोळायला आमच्या दोन्ही पडव्या फारच लहान पडतात त्यामुळे त्याच्यासाठी दोन्ही पडव्या मोठ्या करायचा विचार चिदानंदच्या घरातल्या पडव्या पाहून मी मनोमन ठरवून टाकला.)
संध्याकाळी जो अभूतपूर्व सोहळा पाहिला तो शब्दात कसा मांडू या विचारात मी अडकले आहे.... त्याचे अगदी छोटे चित्रीकरण सर्वांसाठी पाठवते आहे नमुन्यादाखल...
या सोहळ्याची तयारी चार तास आम्ही पहात होतो.रोजची कामं संपवून त्यानंतर सुरू झालेली कलाकारांची रंगभूषा,वेशभूषा,पूजेची तयारी, गावकर्यांची लगबग,तयार होणारा नैवैद्य,सादर केल्या जाणार्या खेळाची उत्सुाता अन् सुपारीच्या झाडांमागून दिसणारा पौर्णिमेचा चंद्र असं एक ना अनेक!
सादरीकरणाविषयी नंतर सविस्तर लेखन करणार आहेच पण वर्षानूवर्षे ऋग्वेद वाचल्यावर,काही भाग शिकवल्यावरही असं वाटलं की हा "जनवेद" सांभाळणंही फार आवश्यक आहे...त्यासाठी तो आधी ऐकावा लागेल,समजून घ्यावा लागेल आणि त्यामागची निरागस प्रामाणिक भावना समजून घेण्यासाठी आपणंही तितकंच निरागस व्हावं लागेल!!!!
आर्या
No comments:
Post a Comment