Tuesday, 1 October 2024




स.प.महाविद्यालयाचा संस्कृत विभाग... तास संपायला दहा मिनिटे बाकी असताना आमच्या कात्रे मॅडमना काय वाटलं कोण जाणे!"अदिती गा ग जरा" असं म्हणून त्यांनी विभागाच्या खोलीचं दार आतूनच टकटक करुन वाजवलं.

मुळात आमच्या विभागात संख्या कमी त्यामुळे आमचा विभाग चिमुकल्या खोलीतच भरायचा! आता त्या चिमुकल्या खोलीच्या चिमुकल्या दारावर टकटक हा संकेत मला समजला आणि मी गायला सुरुवात केली.आमचं काॅलेज म्हणजे सांस्कृतिक खजिनाच आहे आजही! त्यावेळी तर गाण्याच्या स्पर्धा,नाटकाच्या स्पर्धा ,नाट्यवाचन असंच सतत सुरु असे.त्यातून आम्हाला मराठी पद्य विभाग शिकवायला डाॅ.नीलिमा गुंडींसारख्या रसिक मार्गदर्शिका लाभलेल्या! प्रत्येक गाणं गाताना त्याची मूळ कविता आधी पहा..त्याचं नंतर गाणं कसं होतं हे मला माझ्या गाण्याच्या काकूंनी शिकवलेलं! त्यामुळे आहट झाल्याची ती टकटक सूचक होती कारण नुकतीच मी स्पर्धेला हे गाणं गायले होते आणि ते कात्रे मॅडमना ऐकायचं होतं!


हकीकत.... मी पाहिलेला नाही आजतागायत... इतकं गाणं हृदयाजवळचं असताना न जाणो चित्रपट पाहून मलाच दुःख आणखी होईल अशा भीतीने मी तो पाहण्याचं धाडसच केलेलं नाही!

एक दोनदा गाणं फक्त पाहिलं आहे पण मला शब्द आणि भावना अधिक महत्वाची वाटली.

ती वाट पाहते आहे.... तो कुठेतरी दूर त्याच्या ध्येयाप्रती.. अर्थातच देशासाठी (धर्मेंद्र दिसलेही फार उमदे आहेत असं मला कुणीतरी सांगितलं आहे).... पण तिला त्याची चाहूल पक्की ठावकी आहे... कल्पनेतही वेध घेण्यात ती कुठेच चुकत नाही... त्याच्या सवयीही तिच्या इतक्या अंगवळणी आहेत की तो अवतीभवती नसतानाही तिला त्याचेही आभास होत आहेत! प्रत्यक्ष अनुभविल्यासारखे! 

ज्यांनी कट्यार काळजात घुसली नाटक पाहिलं असेल त्यात झरिनाचा आणि उमाचा असाच एक उत्कट संवाद आहे... वाट पाहत राहणं आणि चाहुलीचाही भास होणं! 

अवघड असतं नं ... कितीतरी कठीण! अगदी वाहणारा वाराही त्याला घेऊन येतो आहे की काय! त्याने यावं असं अध्याहृत आहेच या गाण्यात!

या गाण्याचे शब्द आणि त्यातलं सहज सुंदर स्वीकारशीलता असलेलं प्रेम! सोपं,सरळ,साधं आणि तितकंच हळवंसुद्धा! कातरही...

त्याला माहितीही नाही आहे... ती त्याची वाट पाहत उभी आहे... तो नाही आला तरी त्याची चाहुलही तिला पुरेशी आहे... अशी ती अनंत काळही उभी राहील वाट पहात.. माझ्या मनात.....

©आर्या


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...