सर्वांना दीपावली शुभचिंतन#
दिवाळीच्या दिवसांमधे पाठोपाठ संदेश येत राहतात शुभेच्छांचे! त्यामुळे हे थोडंसं आधीच!
तीनसांजा घरी परतणं झालं अन् एका चौकात कंदिलांच्या रांगांनी सजलेला अवकाश अनुभवला...काही क्षणच!!! अहाहा!!!मला ते पतंगाच्या कागदाचे केलेले झिरमिळ्यांचे कंदील आवडतात आणि हे ही तस्सेच होते! त्यातल्या प्रत्येक कंदीलांच्या कागदाचे रंग लेवून प्रकाश बाहेर पडत होता आणि परिसराला उजळवत होता! ते सारं एकजिनसी होऊन गेलं होतं! सहसा असे क्षण कॅमेर्यात टिपणारी मी पण स्तब्धच होऊन पहातच राहिले... एक अनामिक हुरहुर मनात दाटली!
दरवर्षी असं होतं माझं!भावना,संवेदना यांची जाणीव ज्या वयापासून झाली त्या वयापासूनच विशेषतः दिवाळीच्या पूर्वतयारीपासूनच हे काहुर माजायला सुरुवात होते! पण त्याला आनंदाची झालर असते! एक अनाम ओढ असते त्यात दडलेली!
रंगांची उधळण अनुभवायची तर दिवाळीसारखा सण नाही! यक्षरात्रीच ती! दरवर्षी दिसणारे रांगोळी आणि रंगांचे ते ढीग! त्यांच्या छटा प्रत्येकवेळी तितक्याच लोभसवाण्या वाटतात!
टोपल्यांमधे भरून ठेवलेल्या प्रत्येक पणतीची एक गोष्ट असते! नीट ऐकलीत तर ती ऐकू येईल! कुणी साधीशी तर कुणी नक्षीने सजलेली!कुणी भरपूर तेल सामावून घेईल तर कुणी इवलुश्या जीवाच्या ज्योतीला तेजाळत राहील.
यात आणखी एक मनाच्या जवळचा कोपरा म्हणजे छोट्याशा आकारात असूनही आपल्या भरदार मिशांना पीळ देत उभा कुस्तीगीर,चिमुकल्या जिरेटोपात सजलेले आपले शिवराय,हातातल्या पंखाने त्यांना वारा घालणारा मावळा किंवा मातीच्या छोट्या दर्याकपारीत लपून बसायला उत्सुक शूरवीर! कुणी घागर डोईवर घेऊन पदर सावरते तर कुणी भाजीची टोपली घेऊन बसलेली! आपापल्या तंद्रित ते निवांत उभे किंवा बसलेले असतात!किंवा टोपल्यांमधे चक्क लोळत असतात!
हे सारे अचानक जिवंत झाले तर काय बहार येईल! स्वराज्य याची देही याची डोळा मला अनुभवता येईल महाराजांच्या सुराज्यातला एक नागरिक होऊन मला! असं दरवर्षीच वाटतं!
सजलेली दुकानं,खरेदी करणारे ग्राहक,वीजांची रोषणाई हे सारं एकमेकांत मिसळून गेलेलं असतं कारण सर्वांनाच तिच्या आगमनाचे वेध लागलेले असतात!
घरात आता सारं येऊन दाखल झालेलं असतं!भिंतींनाही आता अंघोळ करावीशी वाटते.कोपर्यात दडलेले कोळीदादाही आपलं बस्तान आता आवरतात आणि घरही हसायला लागतं!
झोंबणार्या पहाटवार्यात जाग येण्यापूर्वीची ती रात्र!मला कधीच झोप येत नाही या आदल्या रात्री! अवतीभवतीच्या घरांमधून लखलखणार्या माळा आणि कंदील हाका देत असतात! कितीतरी वेळ खिडकीतून मी तेच पहात असते! मधेच दूरवरून एखादा फटाका मोठ्ठ्याने साद घालतो आणि दचकतेच मी! मला कायम दूरच्या दिव्यांचं आणि दूरवर वाजणार्या फटाक्यांचं आकर्षण आहे! कोण बरं जागं आहे आत्ता? माझ्यासारखंच खुळं होऊन?पहाटेची वाट पहावी असाही धीर निघत नाही बहुधा याला!
शेवटी घड्याळ पहाण्यापूर्वीच आजूबाजूला आवाज घुमू लागतात आणि मांगल्याची पहाट उजाडते!
खरंतर प्रत्येक सकाळ सारखीच असते की! पण दिवाळीची पहाट आणि सकाळ काहीतरी वेगळंच उदरात दडवून उजाडतात!
यमदीपदानाची पणती अर्पण करताना मनातल्या काहुराला डोळ्यांतल्या आसवांची साथ लाभते! तुळशीपुढे पहिला दिवा लावतानाही रमा एकादशीला असेच डोळे पाणावतात! पण दुःखाने नव्हे...
ती भावना नक्की काय असते हे मलातरी गवसलेलं नाही! पण ती अनुभवण्यात वेगळी गंमत आहे!!!शब्दात मांडता न येणं पण तरीही आत कुठेतरी खोल खोल रूतणं म्हणजे काय हे अनुभविण्याची संधी मला दिवाळी देते.तुम्हालाही ती तशीच देत असेल....
आगामी दीपावलीच्या खूप शुभेच्छा!
©आर्या

No comments:
Post a Comment