प्रेम..,अव्यक्त,अस्फुट..कधी डोळ्यातून पाझरणारं कधी गालांवरच्या लालिम्यातून उमलणारं..कधी विद्वत्तेतून ओसंडून वाहणारं तर कधी काहीच नाही... एका अबोल क्षणातूनही खूप काही बोलणारं!
फुलवंती मूळ कादंबरी वाचली नव्हती पण चित्रपटाविषयी उत्सुकता निश्चित होती कारण संगीताच्या जोडीने नृत्य हा ही हृदयाजवळचा विषय! कथानक आदरणीय बाबासाहेबांचं त्यामुळे तिथेही शंकेला वाव नव्हता.चित्रपट माध्यमात काही सवलती घेतल्या जातात पण तरीही मुळातून भावलेलं प्रेम आणि त्यातून झालेलं अहंकाराचं विसर्जन!ही ताकद फक्त प्रेमाचीच आहे.प्रत्येक वेळी ते शारीरिकच असावं या गैरसमजुतीतून बाहेर पडायला लावणारा हा चित्रपट असं मी म्हणेन!
तिच्यातल्या उत्तमतेवर तो भाळला आहे,रंगरूप आहेच पण ते गौण आहे हे समजायलाच लागतं हळूहळू पण चित्रपटाच्या शेवटी!
त्याच्या विद्वत्तेची कीर्ति दिगंतात पसरलेली आणि तिचीही! "कशावरून ती तिच्या क्षेत्रातली पंडिता नसेल?" असा त्याच्या गुरुंचा प्रश्नही खूप काही सांगून जातो.
तरीही समाजव्यवस्थेचा,कुटुंबरचनेचा,राजकीय प्रभावाचा,वैयक्तिक अस्मितांचा प्रगल्भ विचार करत तिला घडविणारा तो! तिच्यातल्या अहंकाराचं विसर्जन करायला लावणं त्याला औचित्याचं वाटतं कारण पुन्हा प्रेमच! ते बोलून दाखवायला लागत नाही,उथळपणा न करताही प्रेम gracefully सुद्धा व्यक्त होतंच नं!
सारं काही मान्य करूनही सारं काही शेवटी सोडून तो ही जातो आणि त्याच्या सहचरीलाही ते समजलं आहे! पण त्यातली स्वीकारशीलताही प्रचंड प्रगल्भ आणि संयत आहे.
आपल्याला मनात ठेवूनच तो दूर गेला आहे हे तिलाही समजल्याने तुळशीवृंदावनाभोवती शेवटी ती ही तितकीच उत्फुल्ल होऊन बेभान होऊन नाचते आहे!
एकमेकांचं,एकमेकांसाठी केवळ दोघांच्या नजरेतून दिसणारं .... प्रेम... ते आपल्या थेट काळजाला भिडल्याशिवाय राहात नाही....
असंच असावं ते! त्याला आणि तिला आयुष्यभरासाठीचं प्रेमाचं वरदान देत त्या कोंदणातच स्वतःला शोधत रहायला प्रोत्साहित करणारं! त्या दोघांमधे तिसरं येतं फक्त प्रेम!
निखळ दृष्टीने पाहिलं तर कथानक आवडेल.पात्र हा चित्रपट आणखी जिवंत करतातच! मला तंत्रातलं फारसं समजत नाही पण कथानक अनपेक्षित कलाटणी घेतं असं सार्यांना वाटेल पण मला चित्रपटाच्या पहिल्याया पंधरा मिनिटातच त्याचा अंदाज आला कारण त्यांच्या लांबूनच एकमेकांवर खिळलेल्या नजरा एक सुंदर फ्रेममधे टिपल्या गेल्या आहेत!! खूप बोलते नजर फक्त ती समजली पाहिजे,उमजली पाहिजे आणि तरलपणे मनावर कोरूनही ठेवता आली पाहिजे!

No comments:
Post a Comment