आपण गंमतीने एकमेकांना म्हणतच होतो की तू कुंभला जाऊन आलीस तर एक डुबकी माझ्यासाठीही मार हं! माझी पण पापं धुवून निघतील!
कुंभमेळ्याला गेलीस तर परत ये हो!नाहीतर तिथेच एखाद्या आखाड्यात संन्यास वगैरे घेशील!
गेले दीड दोन महिने सर्वत्र अशाच चेष्टा सुरु असतील आणि त्यात गैर काही नाही.तो पण एक जगणं आनंददायी करण्याचा भाग आहे.
का वाटत असेल असं आपल्याला?
विशेषतः मला तिथे गेल्यावर जे पहायला मिळालं त्यातून माणूस म्हणून माझी काही learnings आहेत.कदाचित यापूर्वीही मी ते थोडंबहुत जगण्याचा प्रयत्न करत होतेच पण सर्वथैव जमेल असं नाही वाटलं.पण प्रयागराजला जाऊन आल्यावर पुनश्च एकदा अंतर्मुख होऊन विचार करावा असं नक्की वाटलं!
१.आपल्या गरजा किती माफक असाव्यात ही पहिली जाणवलेली बाब! आपण खूपच privileged आहोत ही सर्वप्रथम झालेली जाणीव.शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर मंडळी विमानाने,आपल्या चारचाकी वाहनाने अशी कुंभाला गेली आहेत.काहीजणं बसने गेली आणि पुढचा मोठा टप्पा रीक्षा वगैरे असा प्रवास पोलिसांच्या नियमानुसार त्यांना करावा लागला.तरीही लाखो माणसं अवतीभवती फिरत होती जी या सार्याच्या पलीकडे होती.मी शिकलेली आहे,थोडबहुत लिहू शकते त्यामुळे या सार्याबद्दल मी लिहीत राहिले आहे पण अनेक अल्पशिक्षित महिला या कुंभाला येऊन एका स्नानासाठी जीवाचा आटापिटा करीत होत्या निव्वळ श्रद्धेने! त्यांना काही शोधायचं नव्हतं! कदाचित ही मंडळी स्वतःलाही शोधायला आली नव्हती,किंबहुना महाकुंभाला येऊन त्रिवेणीत स्नान करणे,नदीची पूजा करणे आणि जिथे भंडार्यामधे प्रसाद मिळेल तो भक्तिभावाने सेवन करणे.
अनेक जणांकडे आजही साधे डब्बीचे मोबाईल होते ज्यात फोटो,व्हिडिओ वगैरे काढणेही शक्य नव्हते.
पण त्यांना ते करायचं नाही आहे,त्याचं गंतव्य वेगळंच आहे.
२.तिथे सोय कशी असेल? मला झोपायला जागा मिळेल का तंबूमधे? आज जेवायला काय असेल? मला परतीच्या प्रवासात किती चालायला लागेल? असा कोणताही विचार असंख्यांच्या मनाला शिवलाही नसावा.आपल्या रोजच्या जगण्यात ही माणसं मैलोनमैल चालत राहतात तशीच ती इथे हा विशेष योग साधण्यासाठी चालत होती.पुलांवर जिथे म्हणून जागा मिळेल तिथे बसत होती,मेळ्याचा भाग बनून आनंद घेत होती.
३.(या मुद्द्याचा कुणीही विनाकारण अजेंडा करू नये कारण विषय धार्मिक आस्थेशी जोडलेला आहे पण मला तो महत्वाचा वाटला म्हणून नोंदवते आहे.)
संगमस्नानानंतर अनेक महिला ज्या विशेषतः उत्तर प्रदेश,बिहार या भागातील होत्या त्या स्नानंतर कपडे बदलल्यावर आपल्या नवर्याकडून आपल्या भांगात सिंदूर भरून घेत होत्या.केसातील भांगापासून ते नाकाच्या शेंड्यापर्यंत उतरणारी ती शेंदूराची लाल,केशरी रेषा!
ते झाल्यावर त्यांनी आपल्या नवर्याला नमस्कार करताना मी ठिकठिकाणी पाहिलं आहे.
येणार्या महिलांचा वयोगट मिश्र आहे.वय दहा ते नव्वद! पण साधारण बारा ते पन्नास वयोगटातील महिलांसाठी महत्वाचा विषय म्हणजे मासिक पाळी.चाळिशीनंतर ती मागेपुढे होतच राहते.आजही ग्रामीण भागात पुरेशा सुविधा नसताना तिथे आलेल्या कोटी महिलांमधील हजारो महिलांना या प्रश्नाचा सामना करावा लागला असेल.तरीही त्या कित्येक किलोमीटर पायी चालल्या असतील,रस्त्याच्या कडेला उभारलेल्या स्वच्छतागृहाचा वापर त्यांनी केला असेल!
४.आपल्या मोटरसायकलवर दोन जणांना पाठी बसवून जागोजागी सोडण्याची सशुल्क व्यवस्था आपल्याला देणारे बंधू.आम्ही परमार्थ निकेतनहून पंटून पुलावर आलो रीक्षाने आणि तिथून आमच्या शिबिरापर्यंत आम्ही मोटरसायकलवर बसून आलो.इतक्या गर्दीत विविध आकाराच्या,वजनाच्या माणसांना लीलया तोल सांभाळत त्या मोटरसायकलवरून गंतव्याला सोडणे विशेष कौतुकास्पद!" आप बस पैर नीचे नहीं रखना मॅडम" असं मला आणि माझ्यासह असलेल्या दादाला सांगत आमचा दुचाकीस्वार आम्हाला घेऊन प्रवास करीत होता." पैसेके लिए ही काम करते है क्योंकी यही दिन है कमानेके। पर कोई बुढा हो और पैसे न हो तो वेसे ही छोड देते है हम उसे कभी कबार।" ही माणुसकी त्याच्यातही जिवंत आहे.
मला ताम्हान्यातही जाणवतं की खरा भारत इथे आहे.कुंभमेळ्याला तोच भारत अधिक मोठ्या संख्येने पहायला मिळाला.प्रवासात दिसणारी गव्हाची शेती,सरसोंची शेती, घराबाहेर गोठ्यात वा राखण्यासह फिरणारी गायीगुरं,वासरं,पुष्ट बैल जोडलेल्या बैलगाड्या हे म्हणजे आमच्यासाठी प्रवासातले विशैष बोनस पाॅइंटस् होते.
५.महाकुंभामुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळाले आहेत.ट्रॅफिक जाममधे चहाची किटली घेऊन फिरणारा असो वा महामार्गावर तात्पुरते उभारलेले धाबे असोत!अशांशी मी गप्पा मारण्याची संधी घेतली आहे त्याबद्दल लिहीन कधीतरी!
६.सर्व नागरिकांना सारं सोप व्हावं म्हणून तैनात पोलिस हा तर आणखीनच वेगळा विषय आहे.गणपती विसर्जनाची गर्दी पाहताना मला या सार्यांबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटते.कुंभात तर ती अधिकच वाढली!
अशा सार्यांशी गप्पा व्हायला हव्या खरंतर.त्यांना जे वाटतय ते ही नोंदवून घ्यायला जायला हवं आहे.
कुंभमेळा प्रत्येकाचा आहे,भौगोलिकदृष्ट्या त्याचा परिसर निश्चितच सामाईक आहे पण "मेळ्यात सापडलेला माझ्यातला मी" अर्थातच वेगळा असणार आहे!
No comments:
Post a Comment