Thursday, 20 February 2025

अमृतकण वेचताना भाग ५

 प्रयागराजला उत्तम निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था होणे,संगमावर चांगल्याप्रकारे स्नान करायला मिळणे यासाठी एक ईश्वरी योजना निश्चितच होती.त्याने ICCS च्या माध्यमातून आम्ही  महाकुंभला जावे अशी रचना केली ज्याबद्दल त्या ईश्वरीय चैतन्याची मी सर्वात प्रथम ऋणी आहे आणि त्यानंतर ICCS ला धन्यवाद!(माहेरपणच झालं की तुझं इथे असा माझ्या अहोंनी म्हणणं यातच सारं आलं!)

आमची व्यवस्था सेक्टर १८ येथे सुरभि शोध संस्थान यांच्या शिबिरात केली गेली होती.ICCS च्या सत्रासाठी मी परमार्थ निकेतन आश्रम (सेक्टर २४) येथे सर्व ICCS परिवारासह असताना माझे कुटुंबीय अतिशय चांगल्याप्रकारे सुरभि शोध संस्थानच्या व्यवस्थेचा अनुभव घेऊ शकले.

सुरभि शोध संस्थानची जी व्यवस्था आम्हाला मिळाली त्याविषयी लिहीणे आवश्यकच आहे कारण कोटींच्या कोटी संख्येने येणार्‍या जनसमुदायात आपल्याला इतकी उत्तम सोय लाभणे यामागे या संस्थेच्या योजनांचा व नियोजनाचा मोठ्ठा वाटा आहे ज्याबद्दल खरोखरीच नतमस्तक!

विविध भाविक इथे मोठ्या संख्येने येऊन प्रसादाचा लाभ घेत होते."यहाँ का खाना अच्छा होता है।" असंही मी काही अनोळखी भाविक महिलांकडून तिथेच बाहेरच्या बाजूला उभी असताना ऐकलं.

तंबूंमधे आम्हाला आठ महिलांची व्यवस्था होती व पुरुषांची वेगळी.

उगीचच इतकं सामान घेऊन गेलो असं वाटलं कारण उत्तम पलंग,त्यावर व्यवस्थित गादी,उशी,गादीवर घालायला चादर,वरून कव्हर लावलेली जाड मऊसूत दुलई,अंघोळ करायला मोठा पंचा,तोंड पुसायला छोटा टाॅवेल हे सारं त्या कीटमधे तिथे व्यवस्थित ठेवलेलं होतं.

मी स्वच्छतागृह शोधत बाहेर आले तर समजलं की इथे प्रत्येक खोलीला जोडूनच कमोड,बाथरूम,वाॉश बेसिन आणि हँड वाॅश,आरसा असं सगळं स्वच्छतापूर्वक उपलब्ध होतं.

उत्तम भोजनव्यवस्था,चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत! लेकीसाठी बरोबर गुळाच्या पोळ्या,घारगे असं नेलं होतं ते सारं तसंच परत आलं कारण तिथे छान गरमगरम भोजनाचे लाड होते.

१६ तारखेचा आमचा दिवस बराच पायी चालण्याचा व दिवसभराच्या सत्रांमुळे थकव्याचा झाला होता.आमच्या खोलीवर परत आल्यावर गरम चहा प्यायले.माझी आवडती मऊसर लुसलुशीत मुगाची खिचडी,त्यावर घ्यायला साजूक तूप,गरमगरम कढी,वांग्याची भाजी,पाकातली गरम बुंदी आणि तूप लावलेले फुलके! पिण्याच्या पाण्याची सोय तर होतीच!

देवाने आणखी किती कृपा करावी आपल्यावर?

संस्थेमार्फत असल्याने आमच्याकडून शुल्क नाही घेतले पण आपणही जाणीव ठेवून काही देणगी देऊन येतोच.इतकं पंचतारांकित सारं महाकुंभामधे मिळणं,त्यासाठी रचना बसवणं,हजारो हात त्याला लागणं, केवढी पूर्वतयारी इथे झाली असेल आणि अव्याहत इथे भंडारा सुरू आहे! हे मी केवळ मी जिथे राहिले तिथलं लिहीलं आहे पण अन्यत्रही अशा विविध व्यवस्था आपापल्या परीने सुरू होत्या.

परमार्थ निकेतनला गरम गरम बटाटेवडे सुंदरशा चटणीसह खायला मिळाले! त्याचाही फोटो काढून ठेवलाय.

या व्यवस्थांमुळे महाकुंभातल्या गर्दीतही सारं सुखावह झालं!या सार्‍या सहस्र हातांचे आम्ही ऋणी आहोत.



No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...