Thursday, 20 February 2025

अमृतकण वेचताना भाग ६

 माता भूमिः पुत्रो s हं पृथिव्याः। असं आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलं आहेच.हे केवळ भारतीय परंपरेतच आहे असं नाही तर जगभरातील विविध संस्कृती पृथ्वीला आपली माता मानतात आणि आपण सारेच तिची लेकरं आहोत अशी धारणा आपल्याला विभिन्न परंपरांमधेही दिसते.

जगापुढील विविध राजकीय,सामाजिक,पर्यावरणीय आव्हाने पेलण्यासाठी या एकत्वाची आज आपल्याला नितांत आवश्यकता आहे.

कराग्रे वसते लक्ष्मी ने आपल्या परंपरेत आपण दिवसाच्या सुरुवातीलाच पृथ्वीमातेची क्षमा मागतो व तिच्याप्रती आदर व्यक्त करतो.पंचमहाभूतांची उपासना युगानुयुगे आपण जपत आलेलो आहोतच किंबहुना आपल्या रोजच्या जगण्यातून आपण ते वजा करूच शकत नाही.आपल्या शरीरातही ही पाच तत्वे आहेतच की!

या सार्‍याचा समसमा संयोग म्हणजे KIVA Ritual.

ICCS ने या किवा कुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि सामाईक चर्चासत्रात सहभागही घेतला.

परमार्थ निकेतन आश्रमातील एका मोकळ्या जागेत एक मोठा बर्‍यापैकी खोल खड्डा खणण्यात आला होता.ज्याच्या तीन दिशांना तीन वेदी तयार करून त्यावर काही प्रातिनिधीक उपास्य  चित्रे ठेवण्यात आली होती. गोलाच्या मध्यभागीच्या वेदीवर अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता.यासाठीही विविध संस्कृतींच्या प्रतिनिधींनी,पुरोहितांनी (महिला आणि पुरुष)आपापल्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला.या वेशभूषेलाही  धर्माचरणाचा अर्थ जोडलेला आहेच.

प्रत्येक प्रतिनिधीने पुढे येऊन एकेक करून आपापल्या उपचार पद्धतींनी अग्नीची उपासना व प्रार्थना केली.यातील बर्‍याचशा पुरोहितांनी अप्रदक्षिण पद्धतीने अग्नीला वंदन केले ही विशेष जाणवलेली बाब होती.

तीन दिशांना स्थापन केलेल्या तीन वेदींपैकी मधल्या वेदीवर प्रत्येक संस्कृतीची धार्मिकी प्रतीके ठेवण्यात आली होती ज्यात कुठे पूजनीय मण्यांची माळ,कुठे दोर्‍यांचा क्रोशापासून केलेला चेंडू तर कुठे पक्ष्यांची पिसे असे वैविध्य दिसत होते.

पारंपरिक ड्रम,फ्लूट अशा वाद्यांच्या साथीने त्या त्या संस्कृतीची प्रातिनिधीक प्रार्थनागीते,मंत्र म्हटले जात होते व अग्नीला,पृथ्वीला,सूर्याला प्रार्थना केली जात होती.

सर्व elders  सदस्यांनी शेवटी अग्नीभोवती एकमेकांचे हात धरून गोल प्रदक्षिणा केली.उपस्थित सदस्य आपले हात वर करून बोटे हालवीत पूजेमधे सहभागी होत होते.

या विशिष्ट विधीचे चित्रीकरण वा छायाचित्रण करण्याची परवानगी नसल्याने गुगलवर उपलब्ध फोटो संदर्भासह जोडते आहे.

संध्याकाळी एक चर्चासत्र संपन्न झाले ज्यामधे ICCS चे ईशान्य भारतातील प्रतिनिधी सहभागी झाले व निसर्गपूजनाच्या आपापल्या संकल्पना सर्वांनी मांडल्या.

आपण सर्वजण पाणी पितो,आपण सर्वजण श्वास घेताना हवेतला आॅक्सिजनच शरीरात घेतो..या सार्‍यामुळे आपण प्रेमाच्या आणि एकत्वाच्या धाग्यांनी बांधलेले आहोत आणि पर्यावरणाचा समतोल वैश्विक पातळीवर सांभाळण्यासाठी या स्नेहबंधाच्या सूत्रानेच सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील असे विचार सर्वांनीच मांडले.

ICCS चे घोषवाक्य Mitakuye Oyasin म्हणजे We are one असेच आहे.आपण कोणकोणत्या लौकिक आणि पारलौकिक पातळ्यांवर परस्परांशी जोडलेले आहोत हे लक्षात यायला लागले की भारत,ब्राझील,कैलंबिया असे भौगोलिक सीमांचे डोंगर कोसळून पडतात आणि वसुधैव कुटुंबकम् ची महती आपोआप लक्षात येते!

चला ही महती रोजच्या आचरणात जगण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यासाठी International Centre for Cultural Studies तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे.


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...