Thursday, 20 February 2025

अमृतकण वेचताना भाग ३

 ज्या व्यक्तीला जत्रा फिरायला आवडत असेल,गर्दीचा भाग होऊन त्या गर्दीचा आनंद घ्यावासा वाटत असेल आणि हरतर्‍हेची माणसं वाचायची असतील तर महाकुंभ ही महापर्वणीच!

लाखोंचा महासागर उसळत असतो.विविध सेक्टर्समधून माणसे इतस्ततः पसरत असतात.

प्रयागराजला आत पोहोचल्यावर आमच्या इच्छित सेक्टरला पोहोचेपर्यंंत बराच उशीर झाला होता.प्रयागराजपासून १० किंमी.अंतरावर आम्ही सध्याकाळी ६.३० वाजता होतो आणि इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत रात्रीचे ११.३० झाले.हा सर्व प्रवास चारचाकीनेच झाला आहे.

पोलिसांच्या रचना गर्दीचा अंदाज घेऊन बदलत राहतात आणि  सर्वत्र बोर्ड असले तरी तुम्ही पहिली चार वळणे हमखास चुकता.एक मोठ्ठी साडी किंवा ओढणी अथवा दोरी धरून माणसांचे गट चालत राहतात.लहान मुले हातात किंवा पाठीवर बसलेली,वृद्ध माणसेही मुलीचा,सूनेचा पदर किंवा मुलाच्या,जावयाच्या,भावाच्या खांद्यावरील  पंचा पकडूनच चाललेली. खरा भारत कुंभात पहायला मिळाला आणि आपण ईश्वरकृपेने आणि आईवडिलांच्या,घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने किती privileged आहोत हे इथे पावलोपावली जाणवले.एका पायाला सायटिका आणि दुसर्‍या पायाच्या गुडघ्याचे ACL Tear operation झाल्याने मला वीस पंचवीस कि.मी.चालणे शक्य झाले नसते.मनाची तयारी असली तरी शरीरही चालायला हवं नं! पण आम्ही रीक्षा,दुचाकी आणि आमची चारचाकी असे काही अंतर फिरलो.त्यामुळे पंधरा कि.मी.पेक्षा अधिक आतला टप्पा मी किमान आनंदाने चालू शकले.

आम्ही नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग व तिथून भेडाघाटला पोहोचलो..भेडाघाट राॅक मार्बल्स,धुवाँधार धबधबा पाहिला.तिथेही धुवाँधारपाशी लोक भक्तिभावाने नर्मदेत स्नान करीत होतीच.नग्नतेच्या आपल्या संकल्पना इथे बोथट होतात! मला नाही आवडत पहायला पण लोकांना अशा संकल्पना मनाला शिवूनही जात नाहीत हे जाणवलंच!

भेडाघाटहून प्रयागला येताना वाटेत खाण्याचे तीन चारचप्रदार्थ मिळणारे धाबे ठिकठिकाणी आहेत. मध्य प्रदेश शासनाच्या हाॅटेलच्या चेन्सपण आहेत.पण सर्वत्र व्यवस्थांवर ताण आलेले आहेत.रोटी आणि दालफ्राय,क्वचित पनीरची भाजी ,नाश्त्याला पोहे,सामोसे,कचोरी आणि छोट्या तात्पुरत्या दुकानांवरचा ताजा उकळून ओतलेला कळकट पातेल्यातला चहा!!! धम्माल!

रीवानंतर प्रयागच्या अलीकडे ४० कि.मी.अंतरावर या रस्त्यावरून येणार्‍या मोठ्या बसेस थांबतात.इथून टूर ट्रॅव्हल्सवाले छोट्या रीक्षा वा गाड्यांमधून व्यक्तींना पुढे नेतात.ग्रामीण भारत मात्र डोक्यावर आपलं सामान उचलून चालायलाच सुरुवात करतो.मी या भक्तीपुढे नतमस्तक आहे.

प्रयागला आत पोहोचणे हे पोलिसांच्या रचनांवर अवलंबून आहे. आधीच्या पौलिसाला माहीती नसते दोन चोक सोडून काय असेल! पण आपण जात रहायचे विचारत विचारत.यात्रेकरूंमधून वाट काढीत पुलावरून चारचाकी चालविणे ही कसरत! यातच आम्हाला जशी परवानगी मिळत गेली तसे आम्ही शेवटपर्यंत पुढे जात राहिलो.आतल्या आत झालेल्या गदारोळात साडेतीन तास अशा प्रदक्षिणा घालत राहणे हा अनुभव खास आहे.नंतर सेक्टरच्या रस्त्याला लागल्यावर आपण हुश्श करतो कारण गुगल मावशी एकाचवेळी लाखो भाचरांना दाशा देताना स्वतःच पागल होऊन जाते व स्वतःचे केस उपटायला लागते आणि पोलिसमामा तुम्हाला चौथीकडूनच जायला सांगत असतात!पुढे जाता येत नाही आणि मागे डाता येत नाही!अशीही एक अवस्था येते ज्यात आपण अभिमन्यू होतो.पण यमुना ब्रीज,गंगा ब्रीज चारचाकीतून पार करायला मिळाल्याच्या आनंदात आपल्याला खाली वसवलेली प्रयाछराज नगरी व सुंदर दिव्यांची आरास धिसते व यूथे आल्याची कृतार्थता मनात दाटते! रात्रीच्या अंधारात त्या दिसत नाहीत पण अस्तित्व जाणवते.नकळत हात जोडले जातात त्यांच्या अस्तित्वाला व महाकुंभ रचनाकारांनासुद्धा!


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...