मनभावन श्रावण
डॉ . आर्या आशुतोष जोशी
श्रावण म्हणजे ऊन पाऊस , श्रावण म्हणजे व्रते, श्रावण म्हणजे शंकराची पूजा आणि श्रावण म्हणजे झाडाला बांधलेला झुला !
असा हा मनाला भावणारा श्रावण महिना . हिंदू धर्म आणि संस्कृतीत या श्रावण महिन्याला विशेष असे स्थान आहे . आपल्याकडे चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत वेगवेगळ्या सणांची , व्रतांची विशेष दिवसांची रेलचेल पहायला मिळते . केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत वर्षभर आनंद सोहळ्यांमध्ये रमलेला असतो . असं असलं तरीही मग श्रावणाचं विशेष महत्व का ?
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असते त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे . स्कंद पुराणात या महिन्याला नभा असेही नाव आहे कारण आकाश जसे निर्मळ असते तसेच हा महिना निर्मळ राहण्यासाठी योजला गेला आहे -स्वच्छत्त्वाच्च नभस्तुल्यो नभा इति तत :स्मृत :| स्कंद पुराण १. १९
श्रावण महिन्यातील व्रते समाजातील सर्व समाजगटातील सर्वांनी करावी असेही सांगितले गेले आहे .
स्कंद पुराण या ग्रंथामध्ये तीस अध्याय आलेले आहेत ज्यांना श्रावण माहात्म्य असे म्हटले जाते. यामधे भगवान शंकर स्वतः: सांगतात -
द्वाद्श्वमपि मासेषु श्रावण : मे अति वल्लभ:|
श्रावणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मत :|| स्कंद पुराण १. ७
किं बहुक्तेन विप्रर्षे श्रावणे विहितं तु यत् |
तस्य चैकस्य कर्ताsपि मम प्रियतरो भवेत् || स्कंद पुराण श्रा . मा . ३०. ३६
सनत्कुमार यांनी प्रत्यक्ष शिवाला विचारले त्यावेळी शिवाने सांगितले की श्रावण महिना मला अत्यंत प्रिय आहे . या काळात जे करणे योग्य आहे असे सांगितले आहे त्याचे आचरण जो मनापासून करेल तो मला प्रिय होईल . त्यामुळेच भारतीय समाजमानत श्रावण महिन्याचे विशेष धार्मिक-आध्यात्मिक महत्व मानले गेले आहे .
श्रावण महिन्यातच नाही तर चातुर्मासाचे चार महिने विविध व्रते करण्यासाठी सांगितले गेले आहे . भक्तांच्या मनातील आस्था सांभाळत त्यातून त्या व्यक्तीचा विकास होईल , समाजाचे कल्याण होईल असेही पाहिले गेले आहे .
श्रावण महिन्यात खास करून नियम करून दररोज शंकराला अभिषेक करणे, फुले, फळे, धान्य यांचा लक्ष वाहणे , नक्त उपवास करणे, बिछान्यावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपणे , आपल्याला आवडीच्या वस्तूचा त्याग करणे, दान देणे,खरे बोलणे, अशी विविध व्रते सांगितली गेली आहेत .
श्रावणातील सोमवारी शिवपूजन , मंगळवारी शिव मंगळागौरी पूजा , बुधवारी बुधाची पूजा, गुरुवारी बृहस्पती आणि विष्णू पूजन, शुक्रवारी जिवतीची पूजा , शनिवारी हनुमान आणि रविवारी सूर्याची पूजा अशी व्रते सांगितली आहेत . त्याच्याशी संबंधित कथाही आहेत . याखेरीज गौरीव्रत , श्रीधर पूजा ,सूपौदन व्रत ,श्रावणी कर्म अशी विविध व्रतेही सांगितली गेली आहेत . या सर्वांमुळे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी एका व्रताचे पालन केल्याने आपल्या आचरणाला शिस्त लागते , नेमस्त होण्याची सवय अंगी बाणवली जाते हे महत्वाचे !
श्रावण जसा व्रतांचा राजा तसाच तो सणांचा राजाही आहेच . नागपंचमी , राखी पौर्णिमा , गोकुळाष्टमी हे सारे सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरे होतात .
हरियाली तीज
श्रावण तृतीयेला पंजाब, राजस्थान येथे हा सण महिला साजरा करतात . तीयन , शिंगार तीज अशीही हिची वेगवेगळी नावे आहेत . नवविवाहित मुलीला तिच्या सासरच्या कुटुंबाकडून नवे कपडे,बांगड्या , सिंदूर,मेंदी आणि गोड पदार्थ भेट म्ह्णून दिले जातात . तीज माँ म्हणजेच देवी पार्वतीला उद्देशून स्त्रिया निर्जळी उपवास करतात . आपल्या पतीच्या सुखी आयुष्यासाठी हे व्रत केले जाते . आपल्या माहेरी जाऊनही हे व्रत स्त्रिया करतात . १६ शृंगार केल्याने पतीचे कल्याण होते अशी भावना यामागे आहे .
नागपंचमी
महाराष्ट्रात शेणा- मातीचा नागोबा करून ,त्याची पूजा करून पंचमी करून साजरी केली जाते . मुली आणि महिला वारुळावर जाऊन त्याची पूजा करतात . झाडाला झोके बांधून आनंद घेतात . मराठी मातीतल्या ओव्याही या सणाचे महत्व गातात-
आखाडा मासी एकादसी ,नागार पंचीम कोण्या दिसी ।
पंचमी आली बुधवारी पुस नक्षत्रावरी ।।
कर्नाटकात महिला वारुळापाशी जाऊन निरांजन लावतात आणि दुधाचा नैवेद्य दाखवितात .
केरळ आणि तामिळनाडू येथे या दिवसाला आदि पंचमी म्हटले जाते . दारात आणि अंगणात या दिवशी कुंकवाने किंवा हळदीने नाग काढले जातात . नाग मंदिरात जाऊन अभिषेक केला जातो . या दिवशी शेतीची कामे बंद ठेवली जातात .
आसाम , झारखंड आणि बंगाल प्रांतात विशेषतः कुमारतुली येथे या दिवशी सर्प देवता मनसा देवी हिचे पूजन होते . श्रावण, भाद्रपद या महिन्यांमध्ये हे पूजन करतात . सर्पदंशापासून रक्षण होण्यासाठी मनसा देवीला प्रार्थना केली जाते . शिवाचे विषापासून (हलाहल )तिने रक्षण केले अशीही लोक परंपरा येथे मानली जाते .
राखी पौर्णिमा
महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा आणि कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय यामुळे नारळी पौर्णिमा या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो . कोळी बांधवांच्या सुरक्षेसाठी सागराला विनंती केली जाते. याच दिवशी बहीण भावाला राखी बांधते. पूर्वी या दिवशी प्रजेचे रक्षण करणा-या राजाला रक्षासूत्र बांधले जात असे.
राजस्थान भागात बहिणी फक्त भावाला राखी बांधत नाहीत तर वहिनीला सुद्धा धागा बांधतात . हिला लुम्बा राखी असे म्हणतात . ही राखी वहिनीच्या बांगडीला बांधली जाईल अशी असते .
गुजरात मध्ये या दिवशी रक्षा बंधन होतेच पण त्याच जोडीने शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध, दही , तूप याने स्नान घातले जाते . आपण केलेल्या चुकांची कबुली दिली जाते अंडी देवाचे आशीर्वाद घेतले जातात .
ओरिसा, बंगाल या राज्यात या दिसवही झुलन पूर्णिमा साजरी होते . राधा आणि कृष्णाला झोपाळ्यात बसवून हा दोलोत्सव मंदिरात साजरा केला जातो . हरी भक्ती विलास या ग्रंथात या उत्सवाचा उल्लेख सापडतो . भागवत पुराणातील गोपी आणि कृष्ण यांच्या प्रेमावर आधारित गीते या दिवशी गायली जातात , नृत्य केले जाते .
जन्माष्टमी
जन्माष्टमी म्हणजे कृष्णभक्तीने भारलेली पवित्र रात्र . कृष्ण जन्म वृंदावन येथील मंदिरात भक्तिभावाने संपन्न होतो . जगभरातून भाविक या उत्सवासाठी येतात . नंदगाव येथे या दिवशी नंदोत्सव होतो ज्यामध्ये कृष्णय्याच्या मूर्तीला दूध, दही, तूप यांचा अभिषेक करतात . चंदन , केशर, हळद यांचे लेपन मूर्तीला केले जाते . नंद या गवळ्यांचा राजा असल्याने नंदगावात या उत्सवाचे महत्व विशेष आहे . आपल्या बासरीने गाईंनाही मोहवून टाकणारा कृष्ण आणि त्याचा हा जन्मोत्सव !
असा हा आपल्या संपूर्ण देशाला आनंदाच्या , प्रेमाच्या सूत्राने बांधून ठेवणारा , भक्तिभावाने ओथंबलेला मन भावना श्रावण !
येत्या श्रावणात एखादा छानसा संकल्प करूया आणि तो कृतीतही आणूया !
No comments:
Post a Comment